मुंबई नगरी टीम
मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाने ३० जूनपर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केल्यानंतर आता राज्य सरकारने ३० जून पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.राज्य सरकारने मिशन बिगीन अगेन या धोरणानुसार तीन टप्प्यात काही गोष्टी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.दुस-या टप्पात म्हणजेच ५ जूनपासून सर्व दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र मार्केट कॉम्प्लेक्स आणि मॉल्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नाही.
केंद्र सरकारनंतर आज राज्य सरकारने राज्य सरकारने ३० जून पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्याचा निर्णय घेत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.यामध्ये रेड झोनमध्ये येणाऱ्या महानगरपालिकांमध्येही काही गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मात्र कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाउनचे कडक पालन केले जाणार असून, तेथे सध्या कोणतीही सूट देण्यात आलेली नाही.मुंबई महामगरपालिकेसह मुंबई महानगर परिसरातील इतर महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये टप्प्या-टप्प्याने अनेक गोष्टी सुरू करण्यात येणार आहेत.
राज्य सरकारच्या मिशन बीगिन अगेनचा पहिला टप्पा येत्या ३ जूनपासून सुरू होणार आहे.पहिल्या टप्प्यात सायकलिंग,जॉगिंग, रनिंग,चालणे यासाठी परवानगी देण्यात आली आहे. समुद्र किनारे,सरकारी-खासगी मैदाने,सोसायट्यांची मैदाने,उद्याने अशा ठिकाणी आता आरोग्याच्या दृष्टीने व्यायामासाठी सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, वॉक यांना परवानगी देण्यात आली आहे.मात्र हे केवळ सकाळी ५ ते संध्याकाळी ७ याच वेळेत करता येईल. हे घोळक्याने म्हणजे समूहाने करता येणार नाही. प्लंबर, इलेक्ट्रिशयन, पेस्ट-कंट्रोल आणि टेक्निशियन्स यांना सामाजिक अंतराचे पालन करून कामाला सुरूवात करता येणार आहे.गॅरेजेस सुरू करता येतील.पण गाडी दुरूस्त करणाऱ्याला आधी त्यासाठी पूर्वसूचना देणे आवश्यक करण्यात आले आहे.अत्यावश्यक सेवेमध्ये येणारी सरकारी कार्यालये वगळून इतर सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के किंवा कमीत कमी १५ कर्मचाऱ्यांवर काम सुरू करता येणार आहे.
मिशन बीगिन अगेनचा दुसरा टप्पा ५ जूनपासून सुरू होणार आहे. यामध्ये दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.५ जूनपासून सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी मार्केट कॉम्प्लेक्स आणि मॉल्स यांना परवानगी देण्यात आलेली नाही. दुकाने सुरू करताना रस्त्याच्या,गल्लीच्या किंवा पॅसेजच्या एका बाजूची दुकाने एका दिवशी सुरू असतील तर दुसऱ्या बाजूची दुकाने दुसऱ्या दिवशी सुरू असतील. परंतु त्यांना केवळ सकाळी ९ ते संध्याकाळी ५ याच वेळेत दुकाने सुरू ठेवता येणार आहेत.कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रूम वापरण्याची परवानगी देण्यात आली नाही. कपडे एक्स्चेंज किंवा परत करण्यास परवानगी देण्यात आली नाही. लोकांनी दुकानात किंवा मार्केटमध्ये जाताना पायी किंवा सायकलवर जावे. शक्यतो जवळच्याच दुकानांचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंसाठी दूरचा प्रवास करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. शिवाय यासाठी वाहनही वापरता येणार नाही.एखाद्या मार्केटमध्ये सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे आढळल्यास,ते मार्केट तत्काळ बंद करण्याचे अधिकार संबंधित अधिकाऱ्यांकडे असतील.टॅक्सी,कॅब,रिक्षा यांनाही येत्या ५ जूनपासून परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी १+२ अशा संख्येचे बंधन असेल. म्हणजेच चालक अधिक दोन प्रवासी घेऊन आता टॅक्सी, कॅब आणि रिक्षा सुरू करता येतील.चार चाकी वाहनांसाठीही हाच नियम असेल. मात्र दुचाकीवरून एकाच व्यक्तिला प्रवास करता येईल.
मिशन बीगिन अगेनचा तिसरा टप्पा येत्या ८ जूनपासून सुरू होणार आहे. यामध्ये खासगी कार्यालयांना काही अंशी परवानगी देण्यात आली आहे.खासगी कार्यालयांच्या कामाच्या ठिकाणी केवळ १० टक्के कर्मचाऱ्यांना काम करू देण्यास परवानगी देण्यात आली आहे. इतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करावे लागेल. शाळा, कॉलेज, शैक्षणिक प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लास बंद राहणार आहे.केंद्रीय गृहमंत्रालयाच्या परवानगीखेरीज आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास बंदच राहील. मेट्र रेल्वे सेवा बंद राहील. सिनेमा हॉल, जीम, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरिअम, मंगलकार्यालये बंद राहतील.सामाजिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक एकत्र जमून साजरे होणाऱे कार्यक्रम बंदच राहतील. धार्मिक प्रार्थना स्थळे बंद राहतील.सलून, ब्युटी पार्लर, स्पा सेंटर बंदच राहतील.