शाळा बंदच राहणार मात्र जून पासून शैक्षणिक वर्ष सुरू होणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात कोरोना संकटामुळे येत्या ३० जून पर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.जून महिन्यापासून राज्यातील शाळा सुरू होतात मात्र सध्याची परिस्थिती पाहता शाळा सुरू करणे अशक्य आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीसीद्वारे शालेय शिक्षण विभागाची बैठक घेतली.जूनमध्ये कोणत्याही परिस्थितीत  शालेय वर्ष सुरू झालेच पाहिजे.आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरू करता येणे शक्य आहे तिथे त्या सुरू करणे तसेच जिथे ऑनलाईन शक्य आहे तिथे त्या पद्धतीने का होईना पण शिक्षण सुरू झाले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.

 शालेय शिक्षण विभागाच्या या बैठकीत मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू आमदार कपिल पाटील, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्यासमवेत रघुनाथ माशेलकर, डॉ अनिल पाटील, अनिरुद्ध जाधव तसेच इतर शिक्षण तज्ञही उपस्थित होते.जूनमध्ये कोणत्याही परिस्थितीत शालेय वर्ष सुरू झालेच पाहिजे. आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरू करता येणे शक्य आहे तिथे त्या सुरू करणे तसेच जिथे ऑनलाईन शक्य आहे तिथे त्या पद्धतीने का होईना पण शिक्षण सुरू झाले पाहिजे.कोरोना सारख्या परिस्थितीत शिक्षणाला अडथळा येत नाही हे महाराष्टाने देशाला दाखवून द्यावे असे मुख्यमंत्री  ठाकरे म्हणाले.मुलांचे वर्ष वाया जाऊ देणार नाही.शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते थांबू नये,ज्या शाळा क्वारंटाईन करण्यासाठी ताब्यात घेतल्या होत्या त्यांचे शासन खर्चाने निर्जंतुकीकरण करून देण्यात येईल.दुर्गम भागांत जिथे कनेक्टिविटी नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून शाळा सुरू कराव्यात अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

ज्या ठिकाणी फिजीकल शाळा सुरू करणे अडचणीचे आहे त्या ठिकाणी  इतर पर्याय तसेच ऑनलाइन  शिक्षण सुरू करावे. गुगल प्लॅटफॉर्मचा प्रायोगिक स्तरावर वापर करावा मात्र  स्वतंत्रपणे संगणकीय पद्धती विकसित करून ऑनलाईन शिक्षणाची मजबूत यंत्रणा दीर्घ काळासाठी  विकसित करावी असेही ते म्हणाले.या बैठकीत विना अनुदानित संस्थांमधील शिक्षकांचे प्रश्न, शिक्षकांच्या रिक्त जागा भरणे यावरही चर्चा झाली.10 वर्षांत प्रथमच एखाद्या मुख्यमंत्र्यांनी तब्बल अडीच तीन तास शिक्षण विभागाचे प्रश्न ऐकून घेतले तसेच ते सोडविण्यासाठी आश्वस्त केल्याचे आमदार कपिल पाटील यावेळी म्हणाले.

Previous articleआता प्रवासासाठी ई-पासची गरज नाही; मात्र निर्णय राज्य सरकार घेणार
Next articleमहाराष्ट्रात ५ जूनपासून सर्व दुकाने सुरू होणार मात्र मॉल्स मार्केट बंद राहणार