जाणून घ्या : राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी काय आहेत निकष !

मुंबई नगरी टीम

मुंबई : विधान परिषदेच्या रिक्त होणा-या राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारधील शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या वाट्याला येणा-या जागांसाठी आता राज्यपालांच्या निकषात बसणा-याच उमेदवारांच्या नावाची शिफारस करावी लागणार आहे.यापूर्वी आपले कार्यकर्ते,पदााधिकाऱ्यांची या जागेवर वर्णी लावणे सोपे होते. मात्र महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संघर्ष पाहता प्रत्येक पक्षाला मोठी कसरत करावी लागणार आहे.

यापूर्वी राज्यपाल नियुक्त जागांसाठी सत्ताधारी पक्षाकडून शिफारस करण्यात आलेल्या नावांना राज्यपालांकडून मंजूरी दिली जात होती.मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे निकषानुसारच या नियुक्त्या करतील याची कल्पना महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना असल्याने आणि सध्याच्या परिस्थितीत राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संबंध पाहता या १२ जागांना मंजूरी देताना राज्यपाल प्रत्येक उमेदवार हा निकषात बसतो की नाही हे तपासणार,त्यामुळे या जागेवर योग्य  निकषात बसणारे उमेदवार देण्यावाचून सत्ताधा-यांना कोणताही पर्याय नाही.भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १७१ (1) अन्वये १२ सदस्य राज्यपाल द्वारा नामनियुक्त होत असतात.या जागांवर साहित्य, कला, शास्त्र, सहकारी चळवळ,समाजसेवा या क्षेत्रात विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्तींनाच नामनिर्देशित केले जाते.मुख्यमंत्री राज्यपाल नियुक्त जागांच्या नावांची शिफारस मंत्रिमंडळ बैठकीत ठेवतात आणि त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर ती नावे मंजूरीसाठी राज्यपालांकडे पाठविली जातात.

काय आहेत निकष

साहित्य – किमान ४ पुस्तके प्रकाशित, अखिल भारतीय स्तरावरील साहित्य संमेलनात साहित्यकृतीचे सादरीकरण, मानांकित साहित्य पुरस्कार प्राप्त व्यक्ती

कला – कला (रंगकर्मी) क्षेत्रातील व्यक्ती

शास्त्र – विज्ञान क्षेत्रात कार्य, संशोधक, संशोधनांचे सादरीकरण, पेटेंटधारक, वैज्ञानिक

सहकारी चळवळ – सहकारी संस्था चालविण्याचा अनुभव, सहकारात क्षेत्रात योगदान

समाजसेवा – शिक्षण, समाजकारण, एनजीओ या माध्यमातून किमान १० वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रीय

Previous articleविधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून अनेक महिला पदाधिकारी इच्छूक
Next articleहज यात्रेकरुंना त्यांनी भरलेली संपूर्ण रक्कम कपातीशिवाय परत मिळणार