विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून अनेक महिला पदाधिकारी इच्छूक

मुंबई नगरी टीम

मुंबई  : राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ सदस्यांपैकी १० सदस्यांची मुदत काल संपली आहे तर २ सदस्यांसाठी मुदत येत्या १५ जूनला संपत आहे.या रिक्त जागांवर नियुक्ती करताना राज्यपाल काटेकोरपणे निकष लावूनच नियुक्त्या करणार असल्याने तिन्ही पक्षांनी आपल्या वाट्याला येणा-या जागांसाठी योग्य उमेदवारांची शोधाशोध सुरू केली असतानाच राष्ट्रवादीकडून महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणात इच्छूक असल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे कोणाच्या पारड्यात वजन टाकतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना संधी दिल्याने आता रिक्त झालेल्या राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या आमदारकीसाठी राष्ट्रवादीकडून चार जागांपैकी एका जागेवर महिला पदाधिका-यांना संधी दिली जाणार आहे. मात्र या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी चुरस रंगली आहे. विधानपरिषदेची उमेदवारी मिळावी म्हणून अनेक महिला पदाधिकारी इच्छुक आहेत.विद्यमान विधान परिषद सदस्या विद्या चव्हाण यांना पक्षाने दोन वेळा विधान परिषदेवर संधी दिली असल्याने आता नव्या चेह-याला उमेदवारी दिली जाणार आहे.राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा  रुपाली चाकणकर या अनेक वर्षे सहकार आणि समाजसेवा या क्षेत्राशी निगडीत आहेत.त्यांना नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत संधी दिली जाणार अशी चर्चा होती.मात्र या जागेवर शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना उमेदवारी दिल्याने त्यांना थांबावे लागले होते.राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा या नात्याने त्यांनी अडचणीच्या काळात पक्षवाढीसाठी घेतलेली मेहनत आणि सहकार आणि समाजसेवा क्षेत्रातील अनुभव पाहता निकषानुसार त्यांना पक्षाकडून संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

चाकणकर यांच्यासह माजी  प्रदेशाध्यक्षा आणि अमरावती जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुरेखा ठाकरे.महानंदाच्या माजी अध्यक्षा वैशाली नागवडे,राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्षा सलक्षा सलगर यांचीही नावे चर्चेत आहेत.राहुल नार्वेकर आणि रामराव वडकुते यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुप्रिया सुळे यांच्या अत्यंत विश्वासू अदिती नलावडे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती मात्र अदिती नलावडे आणि शिवाजीराव गर्जे यांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांनी कोणताच निर्णय घेतला नाही.राज्यपालांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला नसला तरी यावेळी अदिती नलावडेही आमदारकीसाठी इच्छुक आहेत. एका जागेसाठी अनेक महिला पदाधिकारी इच्छुक असल्यातरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous articleदाऊद मृत्यू प्रकरणी केंद्राने मौन का बाळगले आहे ?
Next articleजाणून घ्या : राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी काय आहेत निकष !