दिलासा : राज्यात आतापर्यंत कोरोनाचे ७३ हजार ७९२ रुग्ण झाले बरे

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात एकाच महिन्यात दहा दिवसांच्या अंतराने एकाच दिवशी ४१६१ एवढ्या विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना आज घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत ७३ हजार ७९२ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात आज ३५३० रुग्ण घरी सोडण्यात आले. राज्यात मुंबई मंडळात आतापर्यंत ५० हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

२९ मे रोजी राज्यात एकाच दिवशी ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर सातत्याने बरे होणाऱ्या रुग्णांचा आलेख वाढत असून सुमारे १५ दिवसानंतर १५ जून रोजी ५०७१ एवढे रुग्ण बरे होऊन एकाच घरी सोडण्यात आले. आज त्यानंतर पुन्हा एकदा बरे होणाऱ्या रुग्णांची विक्रमी संख्या गाठली आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ५१ टक्के एवढा असून राज्यात सध्या उपचार सुरू असलेल्या एकूण (ॲक्टीव्ह) रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचा कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५० टक्क्यांवर कायम आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

आज सोडण्यात आलेल्या ४१६१ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात ३५३० (आतापर्यंत एकूण ५१ हजार ७३७) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात ३५५ (आतापर्यंत एकूण ११ हजार २९९), नाशिक मंडळात १३९ (आतापर्यंत एकूण ३६५२), औरंगाबाद मंडळ २१ (आतापर्यंत एकूण २५६२), कोल्हापूर मंडळ २४ (आतापर्यंत एकूण १३८३), लातूर मंडळ ७ (आतापर्यंत एकूण ५३२), अकोला मंडळ २६ (आतापर्यंत एकूण १४४८), नागपूर मंडळ ५९ (आतापर्यंत एकूण ११७९) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.

Previous articleअपयश झाकण्यासाठी मृतांचे आणि रुग्णांचे आकडे लपवले जात आहेत
Next articleराज्यात कोरोनाचे ६२ हजार ३५४ ॲक्टीव्ह रुग्ण