राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविला ; राज्य सरकारचे परिपत्रक जारी

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता ३० जून पर्यंत असणारा राज्यातील लॉकडाऊन येत्या ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे.राज्य सरकारने त्यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन यापुढेही सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यात असणा-या लॉकडाऊनची मुदत उद्या म्हणजेच ३० जून रोजी संपत आहे.या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन उठविणार नसल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिले होते. त्यानुसार राज्यातील  लॉकडाऊन आता येत्या ३१ जुलैपर्यंत कायम राहणार आहे. राज्यातील लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आल्याचे परिपत्रक राज्य सरकारने आज जारी केले आहे.याबाबत अनलॉक-२ मध्ये कोणती शिथीलता देण्यात येणार आहे याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.केंद्र सरकारने लॉकडाऊनबाबत अजून कोणतीही घोषणा केलेली नाही मात्र महाराष्ट्रातील सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता राज्य सरकारने लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. अनलॉक-२ बाबत केंद्र सरकारने नियमावली जाहीर केल्यानंतर राज्यातील नियमावली जाहीर केली जाईल.

राज्यात टप्प्या-टप्प्याने अनलॉकबाबत काही शिथीलता देण्यात येत आहे.कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील निर्बध कडक करण्यात आले आहेत.सध्या जिल्हाबंदी कायम असून,एसटी महामंडळाकडून बससेवा सुरु करण्यात आली नाही.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच राज्यातील जनेतशी संवाद साधताना ३० जूननंतर लॉकडाउन उठणार नाही, असे स्पष्ट सांगितले होते. राज्यात असणारे कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नसल्याने राज्यात लॉकडाउन कायम राहणार आहे.

या गोष्टी बंधनकारक

  • मास्क घालून तोंड झाकणे अनिवार्य
  • सोशल डिस्टन्सिंग – सार्वजनिक ठिकाणी सहा फूट (दो गज) अंतर राखणे बंधनकारक

दुकानात पाचपेक्षा जास्त ग्राहकांची गर्दी होणार नाही, याची काळजी दुकानदारांनी घ्यावी

  • लग्नाला ५० पेक्षा जास्त पाहुणे नकोत तर अंत्ययात्रेला ५० पेक्षा जास्त माणसांची गर्दी चालणार नाही
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा दंडनीय अपराध
  • सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, पान, तंबाखू याचे सेवन निषिद्ध

कार्यालयासाठी अतिरिक्त सूचना

  • शक्य तितक्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास प्रोत्साहन द्यावे
  • कार्यालयात थर्मल स्क्रीनिंग, हँड वॉश, सॅनिटायझर प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ ठेवणे अनिवार्य
  • दोन शिफ्टच्या दरम्यान, दरवाज्यांसारख्या सर्वाधिक मानवी स्पर्श होणाऱ्या जागा सॅनिटाईझ कराव्यात
  • दोन कर्मचाऱ्यांमध्ये पुरेसे अंतर राहील, दोन शिफ्ट आणि लंच ब्रेकमध्ये गर्दी जमणार नाही, याची काळजी बाळगावी

मुंबई महापालिका आणि एमएमआर क्षेत्र, पुणे अंतर्गत येणाऱ्या सर्व महापालिका,सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूरमध्ये पुढील गोष्टीना मर्यादांसह मंजुरी

  • अत्यावश्यक सेवांची दुकाने पूर्वीप्रमाणे सुरु राहणार
  • इतर दुकाने संबंधित महापालिकांच्या सूचनेनुसार उघडतील. मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळता सर्व बाजार, दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत उघडतील. मद्य दुकाने परवानगी असल्यास उघडतील (होम डिलिव्हरी किंवा प्रत्यक्ष विक्री)
  • आवश्यक आणि इतर वस्तूंची ई-कॉमर्स विक्री करण्यास मंजुरी
  • औद्योगिक कामे करण्यास मंजुरी
  • खाजगी आणि सार्वजनिक बांधकाम साईट, मान्सूनपूर्व कामे करण्यास मंजुरी
  • होम डिलिव्हरी रेस्टॉरंट/किचनला मान्यता
  • ऑनलाईन/दूरशिक्षण याला मान्यता
  • सरकारी कार्यालये (आपत्कालीन, आरोग्य आणि वैद्यकीय, आपत्ती व्यवस्थापन, पोलिस, अन्न आणि नागरी पुरवठा वगळता) १५ टक्के किंवा १५ कर्मचारी संख्येने (जे अधिक असेल ते) कार्यरत राहतील
  • सर्व खासगी कार्यालये १० टक्के किंवा १० कर्मचारी संख्येने (जे अधिक असेल ते) कार्यरत राहतील
  • टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी – केवळ आवश्यक प्रवासासाठी चालक + २
  • दुचाकी – केवळ चालक
  • प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा तंत्रज्ञ यांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करुन काम करावे, गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती कामे करावीत
  • एमएमआर क्षेत्रा अंतर्गत आवश्यक काम आणि कार्यालयासाठी आंतरजिल्हा (मुंबई-ठाणे इत्यादी) प्रवास करण्यास मुभा. मात्र खरेदीसाठी जवळच्या मार्केटमध्ये जाणे अपेक्षित. अनावश्यक कामासाठी लांब पल्ल्याचा प्रवास करण्याची मुभा नाही
  • लग्नासंबंधी कार्यक्रमासाठी मोकळ्या जागा, लॉन किंवा नॉन-एसी हॉल यांनाच मान्यता
  • सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम या सर्व गोष्टींना परवानगी
  • वर्तमानपत्राची छपाई आणि वितरण मंजूर
  • शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी पेपर तपासणे किंवा निकाल जाहीर करणे या कामासाठी प्रवास करु शकतात
  • केशकर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर यांना नियम पाळून कार्यरत राहण्याची मुभा
  • जिल्हांतर्गत बस सेवा ५० टक्के प्रवाशांसह मंजूर
Previous articleसिंधुदुर्गसाठी जाहीर केलेले २५ कोटी अद्याप पोहोचलेच नाही
Next articleअनिल गोटेंचा गौप्यस्फोट : चंपा आणि टरबुज्याचे बारसे भाजपच्या “या” नेत्यांनी केले