मुंबई नगरी टीम
मुंबई : मुंबई पोलीस दलातील १० पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांवरून महाविकास आघाडी सरकार मधील समन्वयावरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे.या प्रकरणात आयुक्तांनी आणि गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना या बदल्यांची माहिती दिली नसल्याने मुख्यमंत्र्यांनी या बदल्यांना स्थगिती दिली अशी टीका त्यांनी केली आहे.
गृह विभागाने केलेल्या मुंबई पोलीस दलातील १० उपायुक्तांच्या बदल्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीनच दिवसात स्थगिती दिल्याने या प्रकरणावरून महाविकास आघाडीत निर्माण झालेल्या वादावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे.आघाडी सरकारमध्ये कुरघोडीचा प्रयत्न सुरु आहे.त्यातूनच पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलीच गेली नाही.त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या बदल्या थांबवल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. आज त्यांनी ठाणे शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारच्या कामावर टीका केली.पोलीस आयुक्तांच्या समितीला अंतर्गत बदलीचे अधिकार असतात.या बदल्यांबाबत आयुक्त गृहमंत्र्यांना याबाबत माहिती देतात. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री स्वतंत्र असताना गृहमंत्री या बदल्यांची माहिती मुख्यमंत्र्यांना देतात. त्यानंतरच बदल्या केल्या जातात मात्र उपायुक्तांच्या बदल्यांमध्ये आयुक्तांनी आणि गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवल्याने त्यांनी या बदल्यांना स्थगिती दिली असे फडणवीस यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रकरणात समन्वयाचा अभाव तर आहेच, शिवाय एक प्रकारचा अविश्वास देखील आहे. गृहमंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील असतात म्हणूनच ते मंत्री असतात. मात्र या प्रकरणात जी परिस्थिती दिसते त्यावरुन गोंधळच असल्याचे स्पष्ट दिसत आहे असा टोला लगावतानाच कोरोनाच्या स्थितीत गोंधळ योग्य नाही.अधिक समन्वय ठेवून विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.सर्व निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात.त्यांनी मंत्र्यांना विश्वासात घेत निर्णय घ्यायचे असतात.मंत्र्यांनी देखील मुख्यमंत्र्यांकडून परवानगी घेऊन निर्णय घ्यायचे असतात.मात्र सध्या ज्याला जे वाटेल ते ते करतात. कधी अधिकारी निर्णय घोषित करतात, कधी मंत्री तर कधी मुख्यमंत्री निर्णय घोषित करत आहेत. यावरून सध्या अविश्वासाचे वातावरण दिसत असून हा कुरघोडीचाही भाग आहे असेही फडणवीस म्हणाले.अशा बदल्या करताना आयुक्तांनी गृहमंत्र्यांना माहिती देणे अपेक्षित असते,गृहमंत्र्यांनी याची माहिती मुख्यमंत्र्यांना देणे अपेक्षित असते मात्र सध्या राज्य सरकारमध्ये एकमेकांवर कुरघोडीचे प्रयत्न होत आहेत असेही फडणवीस यांनी सांगितले.