माजी मुख्यमंत्र्यांच्या गावातील कोविड सेंटरची मान्यता रद्द करण्याची नामुष्की

मुंबई नगरी टीम

सातारा : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी  सरकारमधील सत्ताधारी पक्षातील प्रमुख नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या गावीच कराड शासकीय कॉटेज हॉस्पिटलची कोविड सेंटरची मान्यता रद्द करावी लागत असेले तर यापेक्षा दुदैर्व काय.यावरुनच सातारा मधील कोविड परिस्थितीची शितावरुन भाताची परिक्षा करता येते अशी जोरदार टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.

विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी आज साता-यामधील  जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर वरे गावातील सावकार आयुर्वेदिक कॉलेज येथील क्वारंटाईन सेंटरला भेट दिली.यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते. शिरवळ येथील तपासणी नाक्याची व्यवस्था पाहिली. तसेच सात-यातील वाढत्या कोविडच्या परिस्थितीसंदर्भात साताराचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालायात बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना व आरोग्य व्यवस्थेसंदर्भात चर्चा केली. यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी भागवत, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र इंगळे, विजय काटवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, माजी मुख्यमंत्र्यांच्या गावातच कोविडची परिस्थिती गंभीर आहे. कराड शासकीय कॉटेज हॉस्पिटलला कोविड हॉस्पिटलची मान्यता दिली होती. परंतु तेथे योग्य इमारत नाही, सोयी-सुविधा नाही, आरोग्य व्यवस्थेचा तुटवडा आहे.तेथे काम करणा-या नर्सेसना कोरोना प्रार्दुभाव झाल्यामुळे हॉस्पिटलची कोविडची मान्यता रद्द करण्याची नामुष्की आली. ही जर सत्ताधारी नेत्यांच्या गावची परिस्थिती असेल तर जिल्ह्याचे व महाराष्ट्राचे काय असा सवालही दरेकर यांनी यावेळी उपस्थित केला.

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव जो महाराष्ट्रात दिसून येत आहे तोच या जिल्ह्यातही दिसून येत आहे. लॉकडाऊन सारखा निर्णय हा येथील पालकमंत्र्यांनी विरोधी पक्षांच्या आमदार, लोकप्रतिनिधी आदींना विश्वासात घेऊन घ्यायाला हवा होता. मनात केवळ लहर आली म्हणून लॉकडाऊन करणे योग्य नव्हे अशी टिका करतानाच दरेकर यांनी सांगितले की, शिरवळ येथील क्वारांटाईन सेंटरची दुरावस्था आहे. राज्यामध्ये जिल्हाधिका-यांना वाटले तर लॉकडाऊन, पालकमंत्र्याच्या मनात आले तर लॉकाडाऊन अशी स्थिती आहे अशी टिका करतानाच दरेकर म्हणाले की, लॉकडाऊन करण्यापूर्वी येथील लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, समाजातील महत्त्वाचे घटक यांचीही मते घेण्याची आवश्यकता आहे. कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्याचाही विचार करणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या परिस्थितीवर विचार करण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेतले नाही, त्याचप्रमाणे सातारा जिल्हयातही तीच स्थिती आहे. खासदार निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे यांनाही विश्वासात घतेले नाही. त्यामुळे येथे प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनतेमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येते आहे. त्यामुळे येथील प्रशासनाचा सर्व कारभार एककल्ली प्रमाणे दिसून येतोय असा आरोपही दरेकर यांनी यावेळी केला.

सातारामध्ये कोविडची परिस्थिती गंभीर आहे. येथे सुमारे ४० टक्के मनुष्यबळाची कमतरता आहे. राज्य सरकार एका बाजूला कोविडसाठी सुसज्ज खाटांची इमारती,  खासगी रुग्णालये, क्वारांटाईन सेंटर उभे करित असले तरी साता-याच्या शासकीय रुग्णालयात मुख्य फिजीशिअनच नाही. १० ते १२ डॉक्टर व ५० टक्के नर्सेसची कमतरता असून येथील वैदयकीय पदे तात्काळ भरण्याची आमची मागणी आहे. जिल्हा रुग्णालयातही केवळ ६ वेंटिलेटर्स असून ही संख्या अपुरी आहे. सातारामध्ये संकटाची स्थिती असून जिल्हाधिका-यांनी आता युध्दपातळीवर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सातारा सारख्या मोठ्या जिल्ह्यात स्वॅब सेंटर नाही. चाचणीचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवावे लागतात हे दुदैर्वी आहे. अजूनही हे सेंटर मान्यतेच्या प्रतिक्षेत आहे. सेंटर साठी साधारण एक कोटीची निधी लागतो. त्यामुळे हे सेंटर उभारणे गरजेचे आहे, पण यामधूनच सरकारची अनास्था दिसून येते अशी टिकाही दरेकर यांनी केला.

यावेळी सातारा येथील डॉक्टर, नर्सेस, सुरक्षा रक्षक या कोविड योध्दांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी शेखर चारेगावकर, नगरसेवक विनायक पावसकर, नगराध्यक्ष सौ रोहिणी शिंदे, धनंजय पाटील कराड तालुका भाजपा अध्यक्ष, कराड उत्तर भाजपा महेश कुमार जाधव, कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, महिला अध्यक्ष जिल्हा कविता कचरे, सारिका गावडे, सीमा घार्गे, फत्तेसिंह पाटणकर, विस्तारक सुनिल शिंदे, संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच दरेकर यांनी कराड येथील कृष्णा इंस्टीट्यूट ऑफ मेडीकल सायन्स, मलकापूर येथील क्वारांटाईन सेंटरला भेट दिली. यावेळी  डॉ. अतुल भोसले,डॉ. सुरेशबाबा भोसले, वैद्यकीय अधिक्षक क्षीरसागर, कराडचे प्रांत दिघे आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleदिलासा : कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येने ओलांडला दीड लाखाचा टप्पा
Next articleमाझ्या वाढदिवसानिमित्त कोणतेही कार्यक्रम आयोजित करु नका !