आशा स्वयंसेविकांना वाढीव मोबदल्याचा लाभ  १ जुलैपासून मिळणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचा कणा ओळखल्या जाणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. त्यासंदर्भात आज आरोग्य विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे. हा वाढीव मोबदला १ जुलैपासून मिळणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुढाकार घेतला होता.

ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका ७४ प्रकारचे विविध कामे करतात. त्याचा त्यांना कामानुसार मोबदला मिळतो मात्र राज्य शासनाकडून २००० रुपये कायमस्वरूपी मानधन देण्याचा निर्णय २५ जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आग्रही भूमिका मांडली होती. त्याला यश मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. आरोग्य विभागाने आज जाहीर केलेल्या शासन निर्णयात नमूद केले आहे की, आशा स्वयंसेविकांना केंद्र शासनाकडून नियमीत ४ कामांसाठी प्राप्त होणाऱ्या मोबदल्याच्या समप्रमाणात कमाल २००० रुपयांपर्यंत दरमहा तसेच गटप्रवर्तकांना दरमहा ३००० रुपये राज्य शासनाच्या निधीतून देण्यात येणार आहे.

Previous articleठाकरे सरकार पाडण्यात रस नाही; फडणवीसांनी घेतली मोदी शहांची भेट
Next articleदुर्घटनाग्रस्त  इमारतीतील बेघर रहिवाश्यांचे तातडीने पुनर्वसन करा