दुर्घटनाग्रस्त  इमारतीतील बेघर रहिवाश्यांचे तातडीने पुनर्वसन करा

मुंबई नगरी टीम

मुंबई : फोर्ट भागात काल कोसळलेल्या भानुशाली इमारतीमधील बेघर झालेल्या रहिवाश्यांचे तातडीने जवळपास पुनर्वसन करण्यात यावे. तसेच मुंबई व उपनगरातील अश्या प्रकारच्या धोकादायक इमारतींचे ऑडिट करुन तेथील रहिवाश्यांचे योग्य प्रकारे पुनर्वसन करण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.

विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी आज फोर्ट भागात काल संध्याकाळी सहा मजली भानुशाली बिल्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी आमदार राहुल नार्वेकर उपस्थित होते. त्यानंतर दरेकर यांनी दुर्घटनेतील जखमींची जे.जे.रुग्णालयात जाऊन भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील बेघर झालेल्या रहिवाश्यांना जवळपास तात्काळ चांगल्या पध्दतीने पुर्नवसन (पीएपी) करण्यात यावे. मुंबईमध्ये अश्या प्रकारच्या ज्या धोकादायक ईमारती आहेत त्यांची यादी तयार करुन त्यांची योजना करुन त्यांचेही तातडीने पुर्नवसन करण्याची व त्यांच्या मूळ ईमारतींचा पुनर्विकास किती वर्षांमध्ये करणार याचा कालबध्द कार्यक्रम तयार करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

इमारत दुर्घटनेसाठी जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्याविरुध्द कारवाई तातडीने कारवाई करण्याची मागणी करतानाच दरेकर यांनी सांगितले की, मुंबईतील ईमारत कोसळण्याच्या दुदैर्वी घटना होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत तरीही सरकारला गांभीर्य दिसत नाही. त्यामुळे मुंबई व उपनगरातील सर्व धोकादायक ईमारतींचा आढावा घेऊन येथील रहिवाश्यांचे योग्य प्रकारे पुनर्वसन करण्यात यावे व त्या ईमारतीमधील रहिवाश्यांना त्यांच्या मूळ ईमारतीत पुन्हा ताबा देण्याबाबत निश्चित कालावधी ठरवुन तसा कार्यक्रम आखण्याच्या सूचना यावेळी घटनास्थळी उपस्थित पालिका उपायुक्त व पोलिस उपायुक्त, म्हाडाचे कार्यकारी अभियंता यांना  दरेकर यांनी सूचना दिल्या.

Previous articleआशा स्वयंसेविकांना वाढीव मोबदल्याचा लाभ  १ जुलैपासून मिळणार
Next articleराजस्थानातील सरकार पाडण्यासाठी भाजप नेत्यांनी ५०० कोटी रूपये जमवले!