उद्धव ठाकरेंना अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई : आयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन येत्या ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असून,आता यावरून राजकीय वातारवण तापण्यास सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नसून, अयोध्येला जाण्याचा रस्ता शिवसेनेनेच तयार केला आहे,अशा शब्दात शिवसेनेनेचे खासदार नेते संजय राऊत यांनी  विरोधकांचा समाचार घेतला आहे.

येत्या ५ ऑगस्ट रोजी आयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. याबाबत बोलताना खा. राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.या सोहळ्यासाठी काही निवडक मान्यवरांनाच निमंत्रण देण्यात आले आहे.या सोहळ्याचे निमंत्रण शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले नाही.यावर राऊत यांना छेडले असता त्यांनी भाजपवर निशाणा साधला.ठाकरेंना अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही. अयोध्येचा रस्ता हा शिवसेनेने तयार केला आहे. अयोध्येच्या रस्त्यातील सर्व अडथळे शिवसेनेने दूर केले आहेत, असेही राऊत यावेळी म्हणाले.शिवसेनेचे आणि आयोध्येचे नातं अतूट आहे.हे राजकीय नातं नाही,आम्ही राजकारणासाठी कधीही आयोध्येला गेलो नाही.पंतप्रधान मोदी यांना अयोध्येला जाण्याचे निमंत्रण मिळाले ही चांगली गोष्ट आहे. त्यानिमित्ताने का होईना ते अयोध्येला जातील अशा शब्दात त्यांनी भाजपला टोला लगावला.

दरम्यान राऊत यांच्या या वक्तव्याचा समाचार भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी घेतला आहे.राम चरणी निमंत्रण लागत नाही तर नम्रता लागते,आणि मुळात निमंत्रण नाही पण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची परवानगी लागेल ना असा टोला उपाध्ये यांनी ट्विट करून लगावला आहे.

Previous articleराज्यातील ५ हजार महाविद्यालयीन तरुणी होणार “सायबर सखी”
Next articleखुशखबर : गणेशोत्सवासाठी गावाला जायचयं..मग चला आपल्या एसटीने