राज्यातील ५ हजार महाविद्यालयीन तरुणी होणार “सायबर सखी”

मुंबई नगरी टीम

मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि रिस्पॉन्सिबल नेटिझम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजीटल स्त्री शक्ती’ उपक्रम राबविण्यात येत असून याचा शुभारंभ उद्या २१ जुलै रोजी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. या उपक्रमांतर्गत मुंबईसह राज्यभरातील १० शहरातील ५ हजार महाविद्यालयीन तरुणींना सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण वेबिनारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

मोबाईल, इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबतच महिलांविरोधातील सायबर गुन्हे, फसवणूक यातही वाढ होत आहे. मुलींना सायबर विश्वातील सुरक्षित वापर आणि वावर याकरिता प्रशिक्षित करण्यासाठी ‘डिजीटल स्त्री शक्ती’ उपक्रम सुरु होत आहे. १६ ते २५ वयोगटातील महाविद्यालयीन तरुणींना इंटरनेटचा सुरक्षित उपयोग, गैरप्रकार झाल्यास कायदेशीर बाबी, मानसिक परिणाम, तांत्रिक फसवणूक आदीबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येईल. १०० वेबिनार मधून राज्याच्या 10 शहरातील ५ हजार तरुणींना ‘सायबर सखी’ म्हणून प्रशिक्षित करण्यात येईल. शुभारंभाचा वेबिनार उद्या २१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता होणार असुन यावेळी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर मार्गदर्शन करतील. घन:श्यामदास सराफ महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीसाठी आयोजित वेबिनारमधे सायबर क्षेत्रातील तज्ज्ञांसह मुंबई पोलिस सायबर शाखेच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर ही उपस्थित राहणार आहेत.

Previous articleठाकरे सरकार मधील “या” कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण
Next articleउद्धव ठाकरेंना अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही