“त्या” ट्विट नंतर अजितदादांनी मातोश्रीवर जावून मुख्यमंत्र्यांना दिल्या शुभेच्छा

मुंबई नगरी टीम

मुंबई : इलेक्ट्रीक वाहनाचे स्टेअरिंग आपल्या हातात असल्याचा मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून शेअर करीत दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नंतर अजित पवार यांनी वांद्रे येथील ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिष्टचिंतन केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ६० वा आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर आलेल्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर सर्वच स्थरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.राष्ट्रपती रामनाथ कोविंद,पंतप्रधान नरेंद्र मोदी,यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर धाव घेतल्याचे चित्र होते.सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील सरकार तीन चाकाचे असले तरी स्टेअरिंग आपल्या हातात असल्याचे भाष्य केले होते. त्यांनतर मुख्यमंत्री ठाकरे यांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत झालेल्या एका कार्यक्रमाचा फोटो शेअर करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.मुख्यमंत्र्यांसोबत  असलेल्या या फोटोत इलेक्ट्रीक वाहनाचे स्टेअरिंग अजित पवारांच्या हातात दिसत असल्याचे दिवसभर या फोटोचीच चर्चा राजकीय वर्तुळात होती.

‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख,महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय श्री. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हिरकमहोत्सवी वाढदिवसानिमित्तानं त्यांचे मन:पूर्वक अभिष्टचिंतन! त्यांना निरोगी व दिर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करतो. उद्धवजींच्या समर्थ, कुशल नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्ध सुरु असलेला लढा आपण निश्चितंच जिंकू तसंच पुरोगामी, प्रगत विचारांच्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशातील व जगातील अव्वल राज्य बनवू, असा मला विश्वास आहे’.अशा ट्विट करून शुभेच्छा देतानाच  हा लक्षवेधी फोटो पोस्ट केल्यानंतर त्यांनी दुपारी थेट मातोश्री गाठत मुख्यमंत्री ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या.

Previous articleसत्ता आणि पैशाच्या जोरावर भाजपाकडून सरकारे पाडण्याचा प्रयत्न
Next articleराज्यात आज ८७०६ रुग्ण बरे झाले तर ७९२४ नवीन रुग्ण आढळले