खूशखबर : एसटी कर्मचा-यांचे पगार लवकरच होणार ; पगारासाठी ५५० कोटी मंजूर

मुंबई नगरी टीम

मुंबई: राज्यात कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेली चार महिने एसटी बसेसची वाहतूक बंद असल्याने महामंडळाला चार महिन्यात सुमारे अडीच हजार कोटींचा तोटा सहन करावा लागला असल्याने महामंडळाकडून एसटी कर्मचा-यांना अर्धा पगार देण्यात येत आहे.यामुळे कर्मचा-यांचे कंबरडे मोडले होते.मात्र आज राज्य सरकारने काही महिन्यापासून रखडलेल्या कर्मचा-यांच्या पगारासाठी ५५० कोटी रुपये मंजूर केल्याने लाखो कार्मचा-यांची चिंता दूर होणार आहे.

कोरोना संकटामुळे मार्च महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन जारी करण्यात आल्याने याचा फटका एसटी महामंडळालाही मोठ्या प्रमाणात बसला आहे.२३ मार्चपासून राज्यातील एसटी बसेसची वाहतूक बंद करण्यात आली असल्याने हजारो एसटी बसेस डेपोमध्येच अडकून पडल्या आहेत.प्रवासी वाहतूक  बंद असल्याने महामंडळाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होवून रोज सुमारे २३ कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे.गेल्या चार महिन्यात एसटी महामंडळाचा तोटा हा अडीच हजार कोटींवर पोहोचला आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार रखडले होते.लॉकडाऊनच्या सुरूवातीला केवळ २५ टक्के तर मे महिन्यात पन्नास टक्के पगाराचे वाटप करण्यात आले होते. कमी मिळणा-या पगारामुळे कर्मचा-यांपुढे आर्थिक समस्या उभ्या राहिल्या आहेत.

कर्मचा-यांच्या पगारावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार,परिवहनमंत्री अनिल परब यांच्यात आज झालेल्या बैठकीत सकारात्मक आणि कर्मचा-यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे.गेल्या दीड महिन्यांपासून रखडलेल्या कामगारांच्या पगारासाठी ५५० कोटी रुपये देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाचे कर्मचारी पगाराच्या विवंचनेत असतानाच महामंडळाने स्वेच्छा निवृत्ती योजनेला मंजूरी दिल्याने कर्मचा-यांमध्ये मोठी नाराजी होती. आज झालेल्या बैठकीत एसटी कर्मचा-यांच्या वेतनासाठी ५५० कोटी मंजूर झाल्याने कर्मचा-यांना पगार लवकरच होतील अशी माहिती परिवहनमंत्री परब यांनी ट्विट करून दिली आहे.

Previous articleपुणे-नाशिक अंतर अवघ्या पाऊणे दोन तासात ; धावणार सेमी हायस्पीड ट्रेन
Next articleसार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानासाठी  ३० कोटी ९३ लाख  मंजूर