मुंबई नगरी टीम
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची आज वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये बैठत पार पडली. यानंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी पार्थ पवारांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती.यावर नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नसल्याचे पवारांनी म्हटले आहे.
अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण राजकीय वळण घेत असताना पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे पार्थ पवार आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेविषयी अनेक तर्कविर्क लावले जात होते. अखेर आज शरद पवारांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली. “नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही. ते अपरिपक्व आहेत”, असं त्यांनी म्हटले.
“एका अभिनेत्याने आत्महत्या केली हे दुर्देवी आहे. असे व्हायला नको होते. मात्र ज्या पद्धतीने माध्यमांत चर्चा होत आहे त्याचे आश्चर्य वाटत आहे. माझ्या जिल्ह्यात २० शेतक-यांनी आत्महत्या केली. परंतु माध्यमांनी त्याची नोंदही न घेतल्याची खंत यावेळी पवारांनी व्यक्त केली”. तसेच महाराष्ट्र पोलिसांवर आपला शंभर टक्के विश्वास असल्याचे म्हटले आहे. शिवाय सुशांच्या प्रकरणावर सीबीआय किंवा इतर यंत्रणेने तपास करावा असे वाटत असेल तर आपण त्याला विरोध करणार नसल्याचे देखील पवारांनी म्हटले आहे.