होय, मी शरद पवारांना भेटलो; कुणालाही चिंतेचे अथवा पोटदुखीचं कारण नाही!

मुंबई नगरी टीम

मुंबई : एकीकडे महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे तर दुसरीकडे राज्यातील राजकारण दिवसेंदिवस तापत आहे. अशात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर स्वतः संजय राऊत यांनी ट्विट करत शरद पवारांना भेटल्याची माहिती दिली आहे.

संजय राऊत यांनी आज वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांची भेट घेतली. “होय, मा. शरद पवार यांना भेटलो. महाराष्ट्रातील व देशातील घडामोडींवर सविस्तर चर्चा झाली. कुणालीही चिंचेचे अथवा पोटदुखीचे कारण नाही”, असे ट्विट संजय राऊतांनी केले. त्यामुळे विरोधकांना हा अप्रत्यक्षरित्या मारलेला टोला असल्याचे बोलले जात आहे. या भेटीनंतर माध्यमांनी अनेक प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यापुढे लावली. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी काही चर्चा झाली का, असा प्रश्न देखील राऊत यांना विचारण्यात आला.

यावर राऊत यांनी उत्तर देत म्हटले, देशातील आणि राज्यातील एकंदर परिस्थिविषयी पवारांशी चर्चा झाली. सुशांत सिंह प्रकरणावर देखील चर्चा झाली. मात्र सुशांतचा विषय हा राजकीय नसून शासकीय आहे. राजकारण चुकीच्या दिशेने सुरू आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. दरम्यान, सुशांतचे प्रकरण रोज नवनवीन वळण घेत आहे. त्यात राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा संबध जोडला जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे खंबीर नेतृत्व असणा-या शरद पवारांनी या सगळ्या प्रकारावर काय सुचना केल्या हे मात्र गुलदस्त्यातच आहे.

Previous articleराज्यात वंचितच्या ‘डफली बजाव’ आंदोलनाला जोर
Next articleपार्थ अपरिपक्व..त्यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही,शरद पवारांची स्पष्टोक्ती