आमच्या सरकारचे सगळे पूल भक्कम,सरकारला कसलाही धोका नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नसून ते फार काळ टिकणार नाही,अशी टीका विरोधकांकडून वारंवार केली जात आहे. याला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत आमच्या सरकारला काहीही धोका नाही,सगळे पूल भक्कम असल्याचे म्हटले आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते. तसंच विरोधकांनी आपल्याला कोणतेही सल्ले देऊ नये, असे राऊत यांनी ठणकावून सांगितले.

“महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालणार.शरद पवारांच्या पाठिंब्याने हे सरकार पाच वर्षे टिकणार आहे. पूल बिहारमध्ये पडलेत. आधीच्या सरकारने बांधलेले पूल पडले आहेत. आमच्या सरकारला काहीही धोका नाही. सगळे पूल भक्कम आहेत.उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार पाच वर्षे चालणार यात आमच्या कोणाच्याही मनात शंका नाही”, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तिन्ही पक्षांचे मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आले आहे. परंतु या सरकारमध्ये आपापसांत समन्वय नसून हे सरकार लवकरच पडणार, अशी सततची टीका विरोधी पक्ष करत आहे. तर काही दिवसांपूर्वीच भाजपचे खासदार नारायण राणे यांनी हे सरकार सप्टेंबरपर्यंत चालणार असल्याचे मोठे विधान केले होते. मात्र उद्धव ठाकरे सरकारला १७० आमदारांचा पाठिंबा असून कसलाही धोका नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

Previous articleमंत्र्यांकडून बदल्यांमध्ये प्रचंड कमाई ; सीआयडी चौकशी करा
Next article“तुम्ही जन्मजात लढवय्ये आहात”… पार्थ पवारांच्या समर्थनार्थ मल्हार पाटलांची पोस्ट