मुंबई नगरी टीम
पंढरपूर : कोरोनाचा कहर काही कमी होण्याचे होण्याचे नाव घेत नाही आहे. त्यामुळे अनेकांना कोरोनामुळे जीव देखील गमवावा लागत आहे. अशात आज राष्ट्रवादीच्या एका नेत्याची कोरोनीशी झुंज अपयशी ठरली आहे. राष्ट्रवादीचे सोलापुरचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू बापू पाटील यांचा जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात कोरोनाच्या उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी दुःख व्यक्त करत पाटील कुटुंबियांच्या दुःखात आपण सामिल असल्याचे म्हटले आहे.
पंढरपूर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. अशातच बापू पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील दोघांना देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र बापू पाटील यांचे चुलते आणि धाकटे बंधू यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर बापू पाटील यांना पुढील उपचारासाठी सोलापूरात दाखल करण्यात आले होते. परंतु आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
राजु बापू पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी समजले जात होते. बापू पाटील यांच्या निधनाने पंढरपूर तालुक्यात शोककळा पसरली आहे. तर सुप्रिया सुळे यांनी देखील त्यांना आदरांजली वाहिली आहे. दरम्यान राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. त्यामुळे सरकारकडून वारंवार खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

















