अजित पवार नाराज नाहीत, महाविकास आघाडीतील नेत्यांकडून खुलासा

मुंबई नगरी टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर अनेक चर्चांना पेव फुटल्याचे दिसत आहे. शरद पवारांच्या विधानानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोणतीही प्रतिक्रिया आली नसून ते नाराज असल्याची चर्चाही रंगली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपापली प्रतिक्रिया व्यक्त करत अजित पवार नाराज नसल्याचे म्हटले आहे.

शरद पवारांनी पार्थ पवारांना फटकारल्यानंतर ही चर्चा आता पवार कुटुंबाच्या अवतीभोवती फिरत आहे. यावर संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, “शरद पवारांना ओळखणे कठीण आहे. परंतु त्यांचे कोणतेही विधान निरर्थक नसते. पार्थ पवार यांच्या भूमिकेवर त्यांच्या पक्षाच्या सर्वाेच्च नेत्याने मत व्यक्त केले आहे. त्यावर मी काही बोलू शकणार नाही. हा त्यांच्या कुटुंबातील अंतर्गत मुद्दा आहे”, असे राऊत म्हणाले. तसंच अजित पवार नाराज नाहीत, माध्यमांत सांगितली जाणारी माहिती चुकीची असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले.

दरम्यान, माध्यमांकडून याच मुद्द्यावरून छगन भूजबळ यांनी देखाल प्रश्न विचारण्यात आला. “शरद पवार यांनी सांगितल्यावर मला काही बोलण्याची गरज नाही. “नया है वह”, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी पार्थ पवारांविषयी म्हटले. शिवाय अजित पवार नाराज नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. पवार कुटुंब सगळे एकत्रित आहेत. अजित पवार दुखावलेले नाहीत. पार्थ पवार यांनी अनेकदा पक्षाच्या विचाराशी विसंगत घेतलेली भूमिका नव्या राजकीय चर्चांना हवा देण्याचे काम करत आहे. त्यामुळे आता अजित पवार जोवर आपली प्रतिक्रिया देत नाही तोवर आजोबा आणि नातू यांच्या वैचारिक मतभेदाची चर्चा अशीच सुरू राहण्याची शक्यता आहे.

Previous articleराष्ट्रवादीच्या नेत्याचा कोरोनामुळे मृत्यू, सुप्रिया सुळेंनी वाहिली श्रद्धांजली
Next articleचाकरमान्यांना टोल माफ मात्र कोरोनाची चाचणी आणि ई-पास बंधनकारक