मुंबई नगरी टीम
रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला जात आहे. परंतु रत्नागिरी जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री अनिल परब यांना १४ दिवस क्वारंटाईन करण्याची मागणी भाजप नेते विनय नातू यांनी केली आहे. यासंदर्भातील मागणी त्यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेसह अनेक प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. परंतु मंत्री सध्या मुंबईत जाऊन बसत आहेत. पालकमंत्री सुद्धा मुंबईला परतले तर अनेक प्रश्न प्रलंबित राहतील.त्यामुळे ध्वजारोहणाच्या निमित्ताने जिल्ह्यात आलेल्या पालकमंत्र्यांना क्वारंटाईन करा, अशी मागणी नातू यांनी केली आहे. सोशल मिडियावर पोस्ट करत विनय नातू यांनी ही माहिती दिली आहे.
“कोवीड-१९ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्याकरता अनेक मोठे निर्णय घेणे गरजेचे आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची शतकपूर्ती आज ना उद्या होणार आहे. जिल्हा रुग्णालयात काम करणारे नामवंत व अनुभवी डॉक्टर डॉ. मोरे यांचा कोरोनामुळेच मृत्यू झालेला आहे. यावरून रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचे गांभीर्य लक्षात येते. जिल्ह्यामध्ये एसटी बाबत अनेक विषय व त्यांचे निर्णय होणे गरजेचे आहे. गौरी- गणपती सणाकरता गणेश भक्त वेगवेगळ्या मार्गाने गावांमध्ये दाखल होत आहेत. त्यांच्या समस्या व त्यावरील उपाय योजना याबाबतही निर्णय होणे गरजेचे आहे. असे असताना जिल्ह्यातील मंत्री क्वारंटाईन होण्यासाठी मुंबईत जाऊन राहतात आणि आता पालकमंत्री पण परत मुंबईला गेले तर अनेक प्रश्न प्रलंबित राहतील.
ज्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेने बिहारचे पोलीस अधिकारी तिवारी यांना मुंबईतच क्वारंटाईन केले त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्री अनिल परब यांना रत्नागिरी जिल्ह्यातच क्वारंटाईन करून ठेवावे म्हणजे जिल्ह्यातील समस्यांची जाण पालकमंत्र्यांना होईल व ते त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना प्रशासनाकडून करून घेतील. त्याद्वारे रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा वाढणारा संसर्ग कमी होऊन जिल्ह्याचे आरोग्य सुधारेल व अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील”, असे विनय नातू यांनी म्हटले.