खटुआ समितीचा अहवाल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे सुपूर्द

मुंबई, दि. 9 : रिक्षा व टॅक्सीची भाडेनिश्चिती करण्यासाठी राज्य शासनामार्फत नेमण्यात आलेल्या खटुआ समितीचा अहवाल या समितीचे अध्यक्ष बी. सी. खटुआ यांनी आज परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे सुपूर्द केला.

224 पानांचा असलेला हा अहवाल आज मंत्रालयात श्री. खटुआ यांनी मंत्री श्री. रावते यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, समितीचे सदस्य गिरीष गोडबोले, नितीन दोशी आदी उपस्थित होते.

परिवहन मंत्री श्री. रावते म्हणाले की, परिवहन विभागामार्फत या अहवालाचा सविस्तर अभ्यास केला जाईल. जनतेवर जास्त भार न पडता भाडेनिश्चिती केली जाईल. शहरांमध्ये धावणाऱ्या ॲप तथा संकेतस्थळचलित सिटी टॅक्सीच्या भाडेनिश्चिती संदर्भातही समितीने शिफारशी केल्या असून त्याचा अभ्यास करुन तात्काळ निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

10 ऑक्टोबर, 2016 रोजी ही समिती नेमण्यात आली होती. 30 सप्टेंबर 2017 पर्यंत या समितीची मुदत होती. समितीने मुदतीत सविस्तर अभ्यास करुन आज हा अहवाल शासनाकडे सादर केला. ऑटो रिक्षा, काळी पिवळी टॅक्सी, सिटी टॅक्सी (संकेतस्थळचलित टॅक्सी), एसी टॅक्सी यांचे दर निश्चित करण्यासाठी ही समिती नेमण्यात आली होती.

०००००

Previous articleअमित शहा यांनी राजीनामा द्यावा
Next articleवैफल्यग्रस्त झालेल्या काँग्रेसकडून बालीश आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here