मुंबई नगरी टीम
पुणे : वारंवार पक्षविरोधी भूमिका मांडणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार हे राजकारणात चर्चेचा विषय बनले आहेत. पार्थ यांच्या अशा भूमिकेविषयी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना विचारले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ पवार माझे मित्र असून पवार कुटुंब हे आदर्शवत कुटुंब आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
पार्थ पवार माझे मित्र असून पवार कुटुंब हे आदर्शवत कुटुंब आहे. कुटुंबातील सध्याचा विषय हा तात्पुरता आहे. तो घरात बसून मिटवला जाऊ शकतो, असे मत राजेश टोपे यांनी मांडले. तसेच पार्थ यांनी आतापर्यंत मांडलेल्या भूमिकेबाबत देखील आपले बोलणे झाले असल्याचे राजेश टोपेंनी स्पष्ट केले. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावर पार्थ यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे सर्वत्र चर्चांणा उधाण आले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ यांना फटकारल्यानंतर कुटुंबात नाराजी नाट्य सुरू असल्याची चर्चा ही झाली. परंतु पवार कुटुंबात एकोपा असून कोणीही नाराज नाही, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मांडली होती. तर राजेश टोपेंनी देखील पुन्हा स्पष्टीकरण देत या मुद्द्यावर पडदा पाडला आहे. तसेच सुशांत प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आपल्याला आदर आहे. शिवाय राज्यातील पोलिसांनी या प्रकरणी चांगले काम केले असल्याचे देखील त्यांनी म्हटले.
दरम्यान, राजेश टोपे यांनी यावेळी इतर मुद्द्यांवर देखील भाष्य केले. पुण्यात सध्या कोरोनाची परिस्थिती बिकट आहे. अशावेळी जे खासगी रुग्णालय अधिक बील आकारत आहेत अशांवर सरकारचे लक्ष आहे. यासाठी काही अधिका-यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यामार्फत रुग्णालयात ८० टक्के बेड मिळावेत म्हणून ऑडिटर नेमले आहेत. अधिक बील आकारणा-या रुग्णालयांवर जिल्हाधिका-यांनी कारवाई करण्याच्या स्पष्ट सुचना दिल्या असल्याचे टोपे यांनी सांगितले.