माजी आमदार अनिल गोटेंचा भाजप नेत्यांवर हल्लाबोल !

मुंबई नगरी टीम

धुळे : घुळ्याचे भाजपचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येच्या घटनेमुळे भाजपच्या नेत्यांना झोप येत नाही मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना धुळ्यातील धर्मा पाटील या शेतक-याने राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या केली होती. त्यावेळी भाजपच्या नेत्यांना पाझर का फुटला नाही असा सवाल गोटे यांनी केला आहे.

अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे.यावरून विरोधकांनी सत्ताधा-यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला असतानाच आता धुळ्यातील भाजपचे माजी आमदार आणि  राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी भाजपवर सडकुन टीका केली आहे.सुशांत प्रकरणी भाजपचे नेते आकाशपातळ एक करीत आहे.मात्र धुळ्यातील  धर्मा पाटील या शेतक-याने मंत्रालयात विष घेवून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण याचा शोध घेण्यासाठी भाजपवे नेमके काय प्रयत्न केले होते असा सवाल माजी आमदार गोटे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.धर्मा पाटील यांनी आत्महत्या करावी अशी परिस्थिती निर्माण करणा-यांना तुम्ही शोधून काढले का ?  असा प्रश्न गोटे यांनी उपस्थित केला. पाटील यांना आत्महत्या करण्याची पाळी आणायला भाग पाडणारे आपल्या मंत्री मंडळातील सहकारी होते म्हणून आपण डोळ्यावर कातडे पांघरुन घेतले होते का असेही गोटे म्हणाले.आपल्या क्ष्रुद्र राजकीय स्वार्थासाठी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यचे भांडवल करणे याला तर प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणारा म्हणतात अशा शब्दात गोटे यांनी भाजप नेत्यांना टोला लगावला.

नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास गेल्या सहा वर्षांपासून सुरु आहे.पण एखाद्या निश्चित व्यक्तीपर्यंत तपास पोहोचलेला नाही असे गोटे यांनी सांगून,सुशांतसिंह राजपुत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्याबाबत गोटे यांना विचारले असता,सीबीआय हे विरोधकांना छळण्यासाठी सरकारच्या हातातले बाहुले बनले असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केली होती अशी आठवण गोटे यांनी सांगून भाजपवर पलटवार केला.

Previous articleपार्थ पवार माझे मित्र…आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सावरली बाजू  
Next articleलवकरच एक युवा नेता सीबीआयसमोर हजर राहण्याची शक्यता !