मुंबई नगरी टीम
मुंबई : आज देशासह राज्यात मोठ्या उत्साहाने गणरायाचे आगमन झाले.मात्र यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट असल्याने उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे.परंतु हा उत्सव असला तरी आपल्याला सामाजिक भान ठेवून तो साजरा करायचा आहे. हीच आपली खरी कसोटी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.यावेळी त्यांनी सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देत स्वतः ची काळजी घेण्याचे देखील आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी गणरायाची विधीवत प्रतिष्ठापना केली. यावेळी पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे देखील उपस्थित होते. यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने व सामाजिक भान ठेवून साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. “दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या दिमाखात वाजत-गाजत आपण साजरा करतो. गणरायाच्या आगमनाबरोबरच इतरही धर्मीयांचे काही धार्मिक सण, उत्सव, परंपरा सुरू झालेले आहे. जैन धर्मीयांचे पर्युषण पर्व त्याची ही समाप्ती आहे. उत्सव सुरू असला तरी आपल्याला पुर्णपणे एका जाणिवेने हा उत्सव साजरा करावा लागत आहे. नागरिकांना आणि गणपती उत्सव मंडळांना धन्यवाद देतो. कारण यावर्षीचा जो उत्सव आहे, उत्सव असतानाच दुसरे एक कोरोनाचे संकट हे अजूनही आपल्या अवतीभोवती घोंघावत आहे. त्याचे भान ठेवून अत्यंत साधेपणाने हा आपला सण साजरा करण्याचे ठरवलेले आहे. यालाच सामाजिक जाणीव आपले कर्तव्य म्हणतात. हा उत्सव असला तरीही ही आपली कसोटी आहे, परीक्षा आहे. गणराया, विघ्नहर्ता आहेच पण गणराय देखील बघत आहे की माझे हे भक्त सामाजिक भान ठेवून माझे स्वागत आणि उत्सव कसा साजरा करतात. उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवा, कोठेही गर्दी करू नका,एकमेकांपासून अंतर ठेवून रहा. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करा”, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
आजपासून गणेशोत्सवाला सुरूवात झाली असून लाडक्या बाप्पाचे घरोघरी आगमन झाले आहे. मुख्यमंत्र्यासह इतर राजकीय नेते मंडळींच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाले आहेत. राज्यातील कोरोना प्रादुर्भाव अजूनही कमी झालेले नाही. यंदाचा गणेशोत्सव देखील साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. यासंदर्भातील नियामवलीही सरकारने जारी केली असून त्याचे पालन करूनच उत्सव साजरा करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.