आजपासून राज्यातील सर्व मंदिरे खुली झाली म्हणून समजा : प्रकाश आंबेडकर

मुंबई नगरी टीम

पंढरपूर : राज्यातील मंदिरे खुली करण्याच्या मागणीवरून वंचित बहुजन आघाडीने आज पंढरपुरात आंदोलन पुकारले होते.वंचितच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आंदोलन अधिक तीव्र केले होते. मंदिर प्रवेशाची आपली भूमिका कायम ठेवत वंचित बहुजन आघाडीनचे नेते प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या शिष्टमंडळाने दरवाज्यातूनच विठ्ठलाचे मुखदर्शन घेतले.तसेच आजपासून सर्व मंदिरे खुली झाली म्हणून समजा, असे प्रकाश आंबडेकर यांनी आंदोलकांना म्हटले.

विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर आंबडेकर यांनी आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी आंबेडकर म्हणाले, “मंदिर, मशीद, बुध्दविहार सुरू केली जातील,असे आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात  आले आहे. त्यासाठी सरकारकडून नियमावाली तयार केली जात आहे. आठ ते दहा दिवसांत ही नियमावली तयार होईल आणि मंदिरे खुली केली जातील”, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरे खुली करण्याबाबत दिलेल्या सकारात्मक आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. तसेच दहा दिवसांत आदेश आले नाहीत तर पुन्हा पंढरपुरात येणार, असा इशारा आंबेडकरांनी दिला आहे. “सरकारने निर्णय घेतले नाहीत म्हणून आम्हाला निर्णय घ्यावा लागला. आम्ही रस्त्यावर लढणारी माणसे आहोत. पुन्हा रस्त्यावर जमण्याची वेळ आमच्यावर आणू नका”, असा इशारा आंबेडकरांनी यावेळी दिला.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर प्रकाश आंबेडकरांनी त्यांचे आभार देखील मानले.तसेच हे आंदोलन येथे थांबले असून शांतपणे तुम्ही तुमच्या गावी परता, असे  आवाहन आंबेडकरांनी जमलेल्या आंदोलकांना केले. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात आंदोलन करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. यासाठी पंढपुरात पोलिसांचा कडक बंदोबस्त देखील करण्यात आला होता. मात्र येथे जमलेल्या लोकांनी मोठी गर्दी करत आंदोलनाला आणखी तीव्र केले.यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला. तर नियम मोडण्यासाठीच इथे आलो आहोत, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी आंदोलकांच्या जमलेल्या गर्दीचे समर्थन यावेळी केले.

Previous articleमंदिर प्रश्नी संजय राऊतांचा विरोधकांवर हल्लाबोल
Next articleअंतिम वर्षाच्या परीक्षा विद्यार्थ्यांना घरातूनच देता येईल यासाठी प्रयत्न