मुंबई नगरी टीम
औरंगाबाद : राज्यातील सर्व धार्मिक स्थळे खुली करण्याबाबत एमआयएमने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासाठी एमआयएम मोहिम राबवणार असून मंदिरे खुली करण्यासाठी पुजा-यांना निवेदन देणार आहेत. तर मशिदी उघडण्याची मोहिम उद्यापासुन सुरू होणार असल्याचे एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले आहे. मात्र मंदिरे खुली करण्याच्या मुद्द्यावरुन आता एमआयएम आणि शिवसेनेत वाद पेटला आहे. मंदिर उघडणारे जलील कोण?,असा सवाल शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. तर हिंदू धर्माचा कोणीही ठेकेदार नाही, असे प्रत्युत्तर जलील यांनी खैरेंना दिले आहे.
इम्तियाज जलील यांनी यापूर्वीच सरकारला अल्टिमेटम दिला होता. तर आज त्यांनी पुन्हा ट्वीट करत ‘आज मंदिर, उद्या मशिद’, असे म्हटले आहे. मंदिरे उघडण्यासाठी एमआयएम औरंगाबाद मधील पुजा-यांना निवेदन देणार आहेत. तसेच मंदिरे खुली करण्याची विनंती करणार आहेत. मात्र यावर चंद्रकांत खैरेंनी आक्षेप घेतला आहे. “मंदिरे खुली करण्याची मागणी सरकारला केली असून येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री त्यावर निर्णय जाहीर करतील. त्यामुळे या मुद्द्यावरुन एमआयएमने राजकारण करू नये”,अशी टीका खैरेंनी केली आहे. यावर जलील यांनी प्रत्युत्तर देत “मंदिरात गेलो तरी त्याचे पावित्र्य राखणार आहोत. मंदिर व धर्मांना कोणीही आपली मक्तेदारी समजू नये”,असा टोला जलील यांनी खैरेंना लगावला. त्यामुळे या मुद्द्यावरुन आता एमआयएम आणि शिवसेना आमने-सामने आले आहेत.
दरम्यान, इम्तियाज जलील यांनी याआधीच सरकारला अल्टिमेटम देत मंदिरे १ सप्टेंबरपर्यंत खुली करण्याची विनंती केली होती. १ सप्टेंबरला गणपती विसर्जन असल्याने हा दिवस हिंदू बांधवांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे १ सप्टेंबराला मंदिरे खुली करावीत आम्ही २ तारखेला मशिदी उघडणार, असा इशारा जलील यांनी सरकारला दिला आहे. मात्र मिशन बिगीन अगेना चौथा टप्पा सुरू झाला तरी सरकारने यावर कोणताच निर्णय न दिल्याने एमआयएमने यावर आक्रमक भूमिका घेतली आहे.