महाराष्ट्रात उपचार घेत असलेल्यांमध्ये ८० टक्के हे लक्षणे नसलेले रूग्ण

मुंबई नगरी टीम

मुंबई : संसर्गजन्य आजारामध्ये प्रतिकारशक्ती हा महत्वाचा घटक असून प्रत्येकाने आपली रोग प्रतिकारशक्ती चांगली ठेवणं गरजेचं आहे. साधारणपणे ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे,त्यांना कोरोनाची बाधा लवकर होऊ शकते किंवा त्याचं स्वरूप सौम्यचं मध्यम, मध्यमचं गंभीर होऊ शकतं. त्यामुळे एका कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीला संसर्ग होतो व इतरांना होत नाही म्हणजे इतरांची प्रतिकारशक्ती सशक्त आहे,अशी माहीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सह्याद्री वाहिनीवरील कोरोनाशी दोन हात या चर्चासत्रात दिली.

आजपासून ७ सप्टेंबरपर्यंत मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून दररोज रात्री नऊ वाजता ही चर्चासत्र मालिका प्रसारीत केली जाणार आहे. शांतीलाल मुथ्था यांनी कोरोनाविषयक जनसामान्यांना पडणाऱ्या प्रश्नांविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी संवाद साधला.त्याचा पहिला भाग आज प्रसारीत झाला. त्यावेळी आरोग्यमंत्री टोपे बोलत होते. सध्या महाराष्ट्रात उपचार घेत असलेल्यांमध्ये ८० टक्के हे लक्षणे नसलेले आहेत.१५ टक्के मध्यम स्वरूपाचा प्रादुर्भाव असलेले आणि ५ टक्के गंभीर स्वरूपाचे रुग्ण आहेत. राज्याचा मृत्यूचा दर हा ३.३ टक्क्यंच्या दरम्यान आहे.हा मृत्यूदर १ टक्क्यापेक्षा कमी करण्याचं उद्दिष्ट आहे. असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

ज्यांना लक्षणे नाहीत याचा अर्थ असा की थोडाफार विषाणू संसर्ग त्यांच्या शरीरामध्ये असेल परंतु त्या रुग्णाच्या शरीरातील न्यूट्रीलायजींग ॲण्टीबॉडीज् नी त्याच्यावर मात करून त्या विषाणूला मारलेही असेल. तो डेथ व्हायरसही असू शकतो. परंतु कोरोना चाचणीच्यामाध्यमातून त्याचे अचूक पद्धतीने निदान करू शकतो. तर अशा वेळेस त्याच्यापासून संसर्ग होणारच नाही. परंतु असिम्प्टोमॅटीक मुळे सौम्य स्वरुपाचा संसर्ग होण्याचा संभव असतो मात्र त्याचे प्रमाण जास्त नसते, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.कोरोनासाठी असलेल्या चाचण्यांबाबत माहिती देतांना आरोग्यमंत्र्यांनी सांगितले, साधारणतः अँटीजेन व आरटीपीसीआर या कोरोना निदान चाचण्या आहेत. तिसरी अँटीबॉडी चाचणीच्या माध्यमातून संसर्ग केव्हा झाला, होऊन गेला का,की आता लगतच्या काळात झाला याबाबी कळतात. एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे अँटीबॉडी टेस्ट मधून समजत नाही. त्यासाठी आरटीपीसीआर चाचणी महत्वपूर्म भूमिका बजावते. तिला आपण गोल्‍ड स्टँडर्ड टेस्ट म्हणतो.

अँटीजेन चाचणीचा रिपोर्ट अर्धा तासात मिळतो. एखाद्या समूहामध्ये १-२ केसेस पॉझिटिव्ह झाल्या तर त्या समूहाची अँटीजेन चाचणी करून आपल्याला संसर्ग रोखण्याच्या दृष्टीकोनातून उपयोग होऊ शकतो. हि चाचणी पॉझिटिव्ह आली तर ती १०० टक्के पॉझिटिव्ह असते. परंतु जर एखादी व्यक्ती सिम्प्टोमॅटीक असेल व लक्षणं असतील तर पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. तिसरी चाचणी आहे अँटीबॉडीज्. जी सर्वेक्षणाच्या दृष्टीकोनातून आवश्यक आहे. आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी जे मोठ्या संख्येने कर्तव्यावर असतात, आघाडीवर राहून काम करतात ह्या सर्वांना मोठ्या प्रमाणात संसर्ग होतो, त्यासाठी अँटीबॉडीज् टेस्ट करता येते. याला रॅपीड अँटीबॉडी टेस्ट म्हणतो. जर अँटीबॉडीज् टेस्ट केली आणि त्यामध्ये आयजीजी च प्रमाण आढळलं तर संसर्ग होऊन गेलेला आहे व त्यापासून इतर कोणाला संसर्ग होणार नाही. या व्यक्तींचा प्लाझ्मा डोनेट केला तर त्यापासून इतरांचे जीव वाचवता येऊ शकतात असेही टोपे यांनी सांगितले.

Previous articleअंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय होणार !
Next articleमोठा निर्णय : आता ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना मिळणार कर्ज