मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार असल्याने मला संपवण्याचा प्रयत्न केला

मुंबई नगरी टीम

जळगाव : भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नेहमीच पक्षात होणारी आपली गळचेपी उघडपणे बोलून दाखवली आहे.यावेळी देखील त्यांनी पक्षातच केल्या जाणाऱ्या राजकारणा विषयी बोलून काही स्वपक्षीय नेत्यांवर निशाणा साधला आहे.मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार असल्याने मला नीटपणे संपवण्याचा प्रयत्न केला.मात्र मी सहजासहजी संपणारा राजकारणी नाही.महाराष्ट्रात भाजपचे सरकार आले असते.मात्र निव्वळ काही नेत्यांच्या प्रवृत्तीमुळे हे सरकार येऊ शकले नाही,असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.तसेच मी स्वस्थ बसणारा राजकारणी नाही, लवकरच अनेक रहस्यांचा खुलासा होईल,असा सूचक इशारा देखील त्यांनी दिला आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंची ही उघड नाराजी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.

एकनाथ खडसे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाजपमध्ये असलेल्या असंतोषाचा विस्फोट यावेळी केला.याविषयी बोलताना खडसे म्हणाले, “महाराष्ट्रात सरकार आले असते. मात्र निव्वळ नेत्यांच्या या प्रवृत्तीमुळे हे सरकार येऊ शकले नाही.हा ओबीसींवर आणि बहुजनांवर अन्याय आहे.अशा स्वरूपाचे धोरण भाजपने घेतले आणि बहुजनांची तिकीटे कापली. चंद्रशेखर बावनकुळेंचे तिकीट गेले, माझे तिकीट कापले गेले.माझ्या मुलीला हरवण्याचा प्रयत्न केला गेला.याबाबतचे सर्व पुरावे मी दिले आहेत. तरी देखील कारवाई होत नाही ?”, असा सवाल खडसेंनी पक्षातील नेत्यांनाच केला आहे.

“जे लोक विधानसभेत आडवे येत होते त्यांना आडवे करण्याचे काम यात करण्यात आले.मी कधीच पक्षावर टीका केली नाही. मी ४० वर्षांपैकी अनेक वर्षे विरोधकाचेच काम केले आहे.त्यामुळे माझा स्वभाव आजही तसाच आहे”, असे खडसे म्हणाले.”मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार असल्याने मला नीटपणे संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र मी सहजासहजी संपणारा राजकारणी नाही. माझ्यावरचे सर्व आरोप खोटे आहेत. अनेकांवर घोटाळ्यांचे आरोप झाले असून सर्वांना क्लीन चीट मिळते. मग मला का मिळत नाही. लवकरच अनेक रहस्यांचा खुलासा होईल”, असा सुचक इशारा खडसेंनी यावेळी दिला आहे. दरम्यान, आपली खदखद व्यक्त करण्याची एकनाथ खडसेंची ही पहिलीच वेळ नाही. मात्र आता त्यांनी पक्षातील काही नेते विशेषकरून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे दिल्लीतील वरिष्ठांकडून खडसेंच्या या नाराजीची दखल घेतली जाईल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Previous articleअधिवेशनाच्या तोंडावर खुद्द विधानसभा अध्यक्षांनाच कोरोनाची लागण
Next articleअमृता फडणवीसांना कंगनाचा पुळका म्हणाल्या,पोस्टरला चपलांनी मारणे योग्य नाही!