अधिवेशनाच्या तोंडावर खुद्द विधानसभा अध्यक्षांनाच कोरोनाची लागण

मुंबई नगरी टीम

मुंबई : येत्या ७ आणि ८ सप्टेंबर रोजी राज्य विधिमंडळाचे दोन दिवसाचे पावसाळी अधिवेशन होत असून,राज्यातील काही आमदारांना आणि मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आले असतानाच आता खुद्द विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनाच कोरोनाची लागण झाली झाल्याने या अधिवेशनावर कोरोनाची दाट छाया आहे.

काही आमदारांसह मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली असतानाच ऐन पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.गेली अनेक दिवस माझ्या मतदारसंघासह संपूर्ण विदर्भात पूरपरिस्थिती आहे आणि त्यासोबतच विविध कामांसंबंधी अनेक दौरे करावे लागले. यादरम्यानच मला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करवून घेतली आणि ती चाचणी पॉझिटिव्ह आली. मी सध्या ठणठणीत आहे, आपण काळजी करू नये, गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी. मी लवकरच कोरोनावर मात करून आपल्या सर्वांच्या सेवेत दाखल होईन असे आवाहन पटोले यांनी समाज माध्यमाद्वारे केले आहे.

Previous articleजे भाजपच्या पोटात ते कंगणाच्या मुखात! : बाळासाहेब थोरात
Next articleमी मुख्यमंत्री पदाचा दावेदार असल्याने मला संपवण्याचा प्रयत्न केला