अजित पवारांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली,प्रविण दरेकरांनी व्यक्त केली खंत

मुंबई नगरी टीम

मुंबई : विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांची पुन्हा नेमणूक झाली आहे.या निवडणुकीत झालेला पराभव हा भाजपचा चांगलाच जिव्हारी लागला आहे.त्यामुळे भाजपने आपल्या अपयशाचे खापर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पायगुणावर फोडले आहे.अजित पवार यांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली,अशी खंत यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली आहे.

उपसभापतीच्या निवडणुकीत नीलम गोऱ्हे यांची निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदनपर भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “नीलम गोऱ्हे उपभापती झाल्या आणि महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. म्हणून त्यांना पुन्हा या पदावर नियुक्त करण्यात आले आहे”, पंरतु यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी मात्र बोचरी टीका केली आहे. अजित दादांचा पायगुण काय होता हे महाराष्ट्राने पाहिले आहे. आमच्यासोबत अजित दादा आले आणि सत्तेचे काय झाले ?, असा टोला दरेकरांनी लगावला आहे. आज विधानपरिषदेच्या उपसभापतीची निवडणूक पार पडण्यापूर्वीच भाजपने या निवडणुकीवर आक्षेप घेतला.या निवडणुकीला भाजपने न्यायालयात आव्हान दिले आहे. याचा निकाल गुरुवारी न्यायालयात देणार असल्याची माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली.त्यामुळे न्यायालयाचा निकाल येत नाही तोवर निवडणुका न घेण्याची विनंती दरेकरांनी केली होती.भाजपच्या या निर्णयामुळे उपसभापतीच्या निडणुकीतील रंगत अधिक वाढली होती.मात्र सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू केली व विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

Previous articleआता वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे सूत्र ‘वन महाराष्ट्र,वन मेरिट’ असणार
Next article‘विचार केला त्यापेक्षा अधिकच नॉटी आहेत’, अमृता फडणवीसांचा संजय राऊतांना चिमटा