मुंबई नगरी टीम
मुंबई : अभिनेत्री कंगना रणाौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती.यावर सामान्यांपासून ते राजकीय स्तरावर मोठा वादंग निर्माण झाला आहे. अनेक नेत्यांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिली असून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनीही आपले मत यावर व्यक्त केले आहे. अशी वक्तव्य करणा-यांना आपण अधिक महत्त्व देत आहोत.याकडे गांभिर्याने लक्ष देऊ नये, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“मला असे वाटते की, अशी वक्तव्य करणा-यांना आपण अधिक महत्त्व देत आहोत. अशा वक्तव्याने जनमानसावर काय परिणाम होईल हे पाहावे लागेल.महाराष्ट्र, मुंबईच्या लोकांना राज्यातील, शहरातील पोलिासांचा कित्येक वर्षांचा अनुभव आहे त्यांचे कर्तृत्व त्यांना माहित आहे. त्यामुळे कोणी पाकिस्तानशी तुलना वैगरे केली त्याकडे गांभिर्याने लक्ष देऊ नये”, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून हा मुद्दा चर्चेचा विषय बनला आहे. शिवसेना आणि मनसेने यावर आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळाली. मात्र याला अधिक महत्त्व देऊ नये, असे शरद पवार म्हणाले आहेत.
पत्रकारांनी यावेळी शरद पवारांना त्यांना आलेल्या धमकीच्या फोनविषयी देखील प्रश्न विचारला. मात्र धमक्यांना फारसे महत्त्व देत नाही. याआधी ही धमक्या आल्या होत्या मात्र त्याची आम्ही नोंद घेत नाही, असे शरद पवार म्हणाले. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांना धमकीचे फोन आल्याची माहिती समोर आली होती. या वृत्तानंतर राजकीय वर्तुळातून चिॆता व्यक्त केली जात होती.