सुशांतसिंग मृत्यू चौकशीवरून लक्ष वळविण्यासाठी दाऊदच्या धमकीचा कांगावा

मुंबई नगरी टीम

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग याच्या संशयास्पद मृत्यूच्या चौकशीवरून दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी मातोश्री उडविण्याची धमकी दिली गेली ,असा कांगावा शिवसेनेकडून केला जात असल्याचा आरोप  भाजपा खा. नारायण राणे यांनी बुधवारी केली. मराठा आरक्षणाच्या सुनावणीकडे महाआघाडी सरकारने लक्ष न दिल्यानेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली,असेही खा.राणे यांनी सांगितले.

राणे म्हणाले की, सुशांत सिंग मृत्यूच्या सीबीआय चौकशीतून बरेच काही बाहेर येत आहे. याकडून लक्ष वेधण्यासाठीच दुबईतून धमकी आल्याचा कांगावा केला जात आहे. कोठून दूरध्वनी आला हे तपासणारी अत्याधुनिक यंत्रणा मुंबई पोलिसांकडे आहे. त्याचा वापर करून कोठून दूरध्वनी आला व कोणी दूरध्वनी केला हे सहज कळू शकते. तसा तपास करा आणि कोणाचा दूरध्वनी आला हे जाहीर करावेमराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकण्यासाठी राज्य सरकारने नामांकित वकील नियुक्त करायला हवे होते. मात्र सरकारने नात्यागोत्यातले साधे वकील नेमले . या वकिलांना राज्य सरकारची मराठा आरक्षणाबाबतची बाजू न्यायालयात व्यवस्थित मांडता आली नाही , असेही खा. राणे म्हणाले.

राणे म्हणाले की,कोरोनाची स्थिती हाताळण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. कोरोनाची स्थिती हाताळण्यात राज्य सरकार कसे अपयशी ठरले आहे,याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मुद्देसूद भाषण केले . मात्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या एकाही मुद्द्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले नाही.दोन दिवसाच्या अधिवेशनात सत्तारूढ पक्षाच्या प्रतिनिधींनी गोंधळ घातल्याने अनेक विधेयके चर्चेविनाच मंजूर केली गेली.अभिनेत्री कंगना राणावत हिने काही आक्षेपार्ह भाषा वापरली असेल तर तिच्याविरुद्ध कायदेशीर मार्गाने कारवाई करण्याचे मार्ग मोकळे आहेत. मात्र ते न करता तिच्याबाबत अपमानास्पद भाषा वापरली जाते आहे, असेही राणे यांनी नमूद केले.

Previous articleकंगनाच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया … म्हणाले !
Next articleकंगना राणावत प्रकरणी चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेवर हल्लाबोल