कंगनाचा बोलवता धनी कोण आहे हे सर्वांना माहित आहे ;खा.अमोल कोल्हे

मुंबई नगरी टीम

मुंबई : देशात सध्या बेरोजगारी,कोलमडलेली अर्थव्यवस्था हे सर्व महत्त्वाचे विषय असताना कंगना प्रकरण वाढवले जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी केली आहे. तर कंगनाचा बोलवता धनी कोण आहे हे सर्वांना कळते महाराष्ट्रातील जनता तेवढी सुज्ञ आहे, असे सुचक विधान अमोल कोल्हे यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

सध्या देशासह महाराष्ट्रावरील कोरोनाचे संकट संपलेले नाही. त्यात बेरोजगारी आणि सातत्याने देशाच्या जीडीपीमध्ये होणारी घसरण चिंताजनक आहे. अशावेळी कंगना रणाैतच्या प्रकरणाला विनाकारण महत्त्व दिले जात असल्याचे मत अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले, “एखाद्या व्यक्तीला आणि त्याच्या वक्तव्यांना किती महत्त्व द्यायचे हे आपण ठरवले पाहिजे कलाकारांनी कायम सामाजिक भान आणि बांधिलकी जपली पाहिजे. अशा वक्तव्यांना अवास्तव महत्त्व देऊ नये”, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले. तर या वक्तव्यांपेक्षा सध्याच्या घडीला इतर आव्हाने महाराष्ट्र आणि देशासमोर आहेत. त्यात बेरोजगारी, जीडीपीची घसरण, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. अशावेळी कंगणा प्रकरणाला अधिक हवा दिली जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

कंगनाचा बोलवता धनी कोणीही असो, हे सर्व शब्दांचे खेळ आहेत. महाराष्ट्रातील जनता तेवढी सुज्ञ असल्याचे अमोल कोल्हे म्हणाले. गेल्या अनेक दिवसांपासून कंगना राणावत प्रकरण वाढत असताना दिसत आहे. कंगना आपल्या ट्वीटच्या माध्यमातून राज्य सरकारला आव्हान देत आहे. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख देखील तिने ऐकेरी शब्दात केला आहे. सध्या यावर शिवसेनेकडून कोणतीही आक्रमक प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु हा वाद लवकर संपुष्टात आला नाही तर राजकीय वातावरण अधिक ढवळण्याची चिन्हे आहेत.

Previous articleकंगना प्रकरणावरून राज्यपालांची सरकारवर नाराजी,केंद्राकडे अहवाल देणार
Next articleआमचा मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होता,एकनाथ खडसेंचे फडणवीसांवर पुन्हा टीकास्त्र