मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावावरून महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात अनेक खटके उडताना पाहायला मिळला होते.मात्र राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नावे आपल्याजवळ पाठवण्याची घाई सरकारलाच नाही, तर त्यात माझा काय दोष, अशी प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली आहे. याकरता त्यांनी हिंदीतील ‘जब मुद्दई सुस्त,गवाह चुस्त’, या म्हणीचा वापर केला. तर माझा राज्य सरकारसोबत कोणत्याही प्रकारचा संघर्ष नाही,असेही यावेळी त्यांनी नमुद केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पदाच्या कार्यकाळास 5 सप्टेंबरला एक वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने ‘जनराज्यपाल भगतसिंह कोश्यारी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी साधलेल्या संवादात अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.
महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात अनेक मुद्द्यांवरून विसंवाद दिसून आला होता.या सर्व प्रसंगाकडे आपण कसे बघता,त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न राज्यपालांना विचारण्यात आला.आपल्यात आणि सरकारमध्ये काहीही संघर्ष नाही.दोन भांडी असतील तर आवाज येणारच,असे स्पष्टीकरण राज्यपालांनी दिले.राज्य सरकाराच्या काही प्राथमिकता असतात आणि त्या पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जातात. माझे सगळेच मित्र आहेत. तर विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत निर्णय झाला असून त्यावर वाद नाही, असेही राज्यपालांनी यावेळी स्पष्ट केले.
शरद पवार, संजय राऊतांची नाराजी
राज्यपाल राज्य शासनाच्या कामात हस्तक्षेप करतात, अशी तक्रार मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून करण्यात आली होती. यावर बोलताना राज्यपाल म्हणाले, आपलीच माणसे आपल्यावर बोलली तर नाराजी कशाला. या दोघांपैकी जे माझ्यापेक्षा मोठे आहेत त्यांचा मला आदर आहे. जे लहान आहेत ते मला पितृतुल्य मानतात, असे राज्यपाल म्हणाले.
पहाटेचा शपथविधी
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी हा महाराष्ट्राच्या राजकारणातील न विसणाऱ्या क्षणांपैकी आहे. त्यात राज्यपालांच्या भूमिकेवर अनेकांनी संशय व्यक्त करत टीका केली होती. मात्र रामप्रहार खूप शुभ मनाला जातो.रामप्रहरी झालेल्या या शपथविधीवर तुम्ही कशाला प्रहार करता, असा उलट प्रश्नच राज्यपालांनी यावेळी केला.
मी कधीही नाराज नव्हतो
सध्या चर्चेत असलेल्या कंगना प्रकरणावर बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले आपले याच्याशी देणेघेणे नाही. मी कधीही नाराज नव्हतो, असे त्यांनी स्पष्ट केले. कंगनाच्या कार्यालयावर मनपाने केलेल्या कारवाईवर राज्यपाल नाराज असल्याचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले होते. मात्र या वृत्ताचे खंडन करत आपण नाराज नसल्याचे कोश्यारी म्हणाले.