अयोध्या कोणाच्या बापाची नाही, विश्व हिंदू परिषदेला विजय वडेट्टीवारांचा सज्जड दम

मुंबई नगरी टीम

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना यांच्या वादात विश्व हिंदू परिषदेने उडी घेत मुख्यमंत्र्यांना विरोध करण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत येऊ नये, अशी घोषणा विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली होती. यावर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विश्व हिंदू परिषदेला सज्जड दम भरला असून, मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. अयोध्या कोणच्या बापाच्या मालकीची नाही. कोणी कोणाला रोखू शकत नाही,हिंमत असेल तर रोखून दाखवावे,असा इशाराच त्यांनी यावेळी दिला.

यावर अधिक बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “विश्व हिंदू परिषद धर्माचे मालक नाहीत. केवळ विश्व हिंदू परिषद स्थापन केली म्हणून धर्माचे मालक झाले का? आम्ही हिंदू नाही का? विश्व हिंदू परिषदेला राजकीय भानगडीत पडण्याची गरज नाही. याचा फायदा भाजपला पोहचवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने वळवळ करू नये”, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. “अयोध्या कोणाच्या बापाची नाही. कोणाच्या बापाच्या मालकीची नाही. त्यामुळे कोणी कोणाला रोखू शकत नाही. हिंमत असेल तर रोखून दाखवावे”, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. उद्धव ठाकरे यांना वाटेल तेव्हा ते अयोध्येला जातील. प्रत्येकाच्या धार्मिक भावनेचा हा प्रश्न असून कोणी अडवायचा विषय नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून कंगना प्रकरणाची बरीच चर्चा रंगली आहे. यात भाजपने देखील कंगनाला समर्थन देत राज्य सरकारवर ताशेरे ओढले. हा विरोध सुरू असतानाच विश्व हिंदू परिषदेनेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत येऊ नये. आणि आलेच तर त्यांचे स्वागत होणार नाहीच शिवाय विरोधाला तोंड द्यावे लागेल, अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेने घेतली होती. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देत काँग्रेसही मैदानात उतरलेली दिसत आहे.

Previous articleशिवसेनेचे महाराष्ट्रात गुंडाराज…सरकारची भूमिका संशयास्पद
Next articleमहापौरांनी एसआरएचा फ्लॅट बळकावल्याचा  किरीट सोमय्यांचा आरोप