मग ‘ही’ फसवणूक होती का ? कंगना हिमाचलला परतल्याने काँग्रेसकडून आश्चर्य व्यक्त

मुंबई नगरी टीम

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत मुंबईत आली, तिने पाहिले, तिच्यामुळे राजकीय वातावरण तापले आणि आज ती पुन्हा हिमाचल प्रदेशातील आपल्या गावी परतली आहे.परंतु कंगनाच्या जाण्यावर काँग्रेसकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले असून काही प्रश्नही उपस्थित करण्यात आले आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी याबाबत ट्वीट करत पुन्हा कंगनाला फटकारले आहे.

“कंगना हिमाचल प्रदेशला निघून गेली हे ऐकून आश्चर्य वाटले. ड्रग्ज माफिया आणि त्यांच्या बाॅलिवूडशी संबंधांबाबत तिला माहित असलेल्या माहितीचे काय? ही माहिती नार्कोटिक्स विभागाला देणे हे तिचे कर्तव्य नाही का? एखाद्या गुन्ह्याविषयीची माहिती स्वतःकडे ठेवून, ती पोलिसांना न देणे हा भारतीय दंडसंहितेच्या कलम २०२ व १७६ तसेच एनडीपीसी कायद्यांतर्गत गुन्हा नाही का? की केवळ ही एक फसवणूक होती का?”, अशा प्रश्नांची सरबत्तीच सचिन सावंत यांनी केली आहे.

अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाच्या तपासादरम्यान ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहे. यावर कांगनाने बॉलिवूडवर निशाणा साधला. ड्रग्ज माफियांशी बॉलिवूडमधील अनेकांचे संबंध आहेत, असा आरोप कंगनाकडून करण्यात आला होता. तर या संदर्भात आपल्याकडे माहिती असल्याचेही कंगनाने सांगितले होते. मात्र कंगनाने यापैकी कसलीही माहिती एनसीबी व पोलिसांना दिली नसून ती हिमाचलला परतली आहे. त्यामुळे कंगना सांगत असलेले ड्रग्ज माफिया आणि बॉलिवूडचे कनेक्शन ही निव्वळ एक अफवा होती का? असा गंभीर प्रश्न सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. तर यावर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनीही टीका केली आहे. “ज्या लोकांनी शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी गेले आठवडाभर कंगनाची बाजू घेतली. त्या सर्वांची तोंडे काळे करून ती आज गेली”, अशी बोचरी टीका प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

Previous articleमराठा आरक्षणप्रश्नी सर्व खासदारांनी एकत्र या,संभाजीराजे भोसले यांचे आवाहन
Next articleमी नाउमेद नाही, पुन्हा मैदानात येईन : पंकजा मुंडे