मी नाउमेद नाही, पुन्हा मैदानात येईन : पंकजा मुंडे

मुंबई नगरी टीम

मुंबई : सध्या महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती बिकट आहे. अशावेळी सत्ताधारी पक्षासह भाजपमधील अनेक नेते राज्यातील विविध भागांत जाऊन परिस्थितीचा आढावा घेताना दिसत आहेत. मात्र भाजप नेत्या पंकजा मुंडे सक्रिय राजकारणापासून लांब असल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या मतदारसंघात त्या जात नसल्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. परंतु आपण आपल्या मतदारसंघापासून दूर राहून देखील तिथल्या प्रश्नांनावर लक्ष देत आहोत. तर कोरोना जाऊदे त्यानंतर पुन्हा त्याच वेगाने मी मैदानात येईन, असे आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

पंकजा मुंडे मतदारसंघात जात नाहीत,लोकांमध्ये जात नाहीत,राज्याच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे त्या नाउमेद झाल्या का ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. मी नाउमेद नाही, माझ्यात चांगली उमेद आहे.सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे मी फिजिकल डिस्टन्सिंग पाळत आहे.माझे कार्यालय सुरू आहे. मतदारसंघातील प्रश्न तिथेच जाऊन सोडवावे लागतात असे नाही,असे पंकजा मुंडे म्हणाल्या. तर राज्याचा कारभार आपण पहिला आहे. काम केले आहे. तिथे गेले की कार्यकर्ते गर्दी करतात या सर्व जाणिवेने मी जाणे टाळले आहे. सध्या माझ्याकडे आता कोणतेही पद नाही. त्यामुळे तिथे जाऊन बैठक घेणे आज माझे ते दायित्व नाही. ऑनलाईन पद्धतीने मी सगळे सांभाळत आहे. पक्षाच्या अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहे. एखाद्या ठिकाणी आपल्या जाण्याने वर्दळ होत असेल तर तिथे न जाणे हाच उपाय आहे. त्यामुळे कोरोनाचा काळ संपल्यावर मी पुन्हा मैदानात दिसेन असे, आश्वासन पंकजा यांनी दिले आहे.

पंकजा मुंडे यांनी यावेळी ऊसतोड कामगारांच्या मुद्यावर देखील भाष्य केले. कारखाने सुरू होतील तेव्हा ऊसतोड कामगार कामावर रुजू होतील. दरवर्षी ऊसतोड कामगारांचा करार असतो. यामध्ये त्यांच्या मजुरीत वाढ, मुकादमांच्या कमिशनमध्ये वाढ, ते जिथे जातील तिथे कोरोनावर झाला तर मोफत उपचार, गर्भवती महिलांसाठी योजना, ऊसतोड कामगारांच्या मुलींच्या लग्नाबाबत काही योजना अशा अनेक मागण्यांचा यात समावेश आहे. त्यावर सकारात्मक चर्चा सुरू आहे. तोवर ऊसतोड कामगारांनी कोयता म्यान ठेवावा, असे आवाहन यावेळी पंकजा मुंडे यांनी केले.

Previous articleमग ‘ही’ फसवणूक होती का ? कंगना हिमाचलला परतल्याने काँग्रेसकडून आश्चर्य व्यक्त
Next articleमंत्री जयंत पाटील यांच्यामुळे १५ महिन्याच्या ऋतूराजला मिळाले जीवनदान