मुंबई नगरी टीम
अमरावती : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे दोन दिवसांच्या नागपूर आणि अमरावती दौ-यावर असून,आज ते अमरावती मध्ये असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पाच कार्यकर्त्यांना भेटीसाठी वेळ दिली असतानाही अभाविपच्या कार्यकर्त्यांनी समाज माध्यमातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे वातावरण निर्माण करीत सामंत यांच्या स्वीय सहायकाला फोन करून थेट सामंत यांनाच धमकी दिल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे दोन दिवसांच्या नागपूर आणि अमरावती जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत.त्यांनी काल नागपूर मध्ये विविध आढावा बैठकांना हजेरी लावली.त्यांनतर ते अमरावती जिल्ह्यातील संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा आढावा घेण्यासाठी पोहचले.या विद्यापीठाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेवून संपूर्ण आढावा आणि खात्यासंदर्भात माहिती दिली.त्यांनतर ते नागपूरला रवाना होणार होते.अभाविपच्या शिष्टमंडळाने विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मंत्री सामंत यांच्या भेटीची वेळ मागितली होती.त्यानुसार सामंत यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ पाच कार्यकर्त्यांनी भेटीसाठी येण्याची सूचना केली.मिळालेल्या माहितीनुसार भेटीच्या वेळेपूर्वी काही अभाविपच्या कार्यकर्त्यांनी समाज माध्यमातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे वातावरण तयार करून,संपूर्ण शिष्टमंडळाला भेटण्याची मागणी लावून धरली.अभाविपच्या कार्यकर्त्यांनी समाज माध्यमातून केलेल्या मागण्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून धुळ्यातील घटनेची पुनरावृत्ती होवू नये म्हणून पोलीसांनी या कार्यकर्त्यांना अटकाव केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
मंत्री सामंत यांनी भेटीसाठी पाच कार्यकर्त्यांना परवानगी दिली असतानाही अभाविपच्या कार्यकर्ते आपल्या हट्टावर कायम होते.हा प्रकार सुरू असतानाच मंत्री सामंत यांच्या स्वीय सहायकाच्या भ्रमणध्वनीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एका कार्यकर्त्यांने थेट धमकीच दिल्याने एकच खळबळ उडाली.”मंत्र्यांना मुंबईला जायचे आहे.त्यामुळे ते अमरावतीमधून नागपूरला कसे जातात ते बघतो” अशी धमकी अभाविपच्या कार्यकर्त्यांने दिल्याने धुळ्यासारखी घटना घडू नये म्हणून पोलीसांना सुरक्षा व्यवस्थेत वाढ करावी लागली.काही कार्यकर्त्यांची पोलीसांनी धरपकड केल्याचे समजते.या प्रकारानंतर मंत्री सामंत हे नागपूरला रवाना झाले.