कांद्याचा वांदा करायला केंद्र सरकार कायम तयार :  छगन भुजबळांची टीका

मुंबई नगरी टीम

मुंबई : केंद्र सरकारकडून तात्काळ कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. अनेक वस्तूंचे भाव वाढतात पण केवळ कांद्यावर निर्यातबंदी का आणली जाते. कांद्याचाच वांदा करायला सरकार नेहमी तयार असते अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे. आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

केंद्र सरकारने अचानक सोमवारी कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाकडून त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. निर्यातबंदीमुळे आंतरराष्ट्रीय कांदा व्यापारावर त्याचा परिणाम होईल, अशी चिंताही यावेळी छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. यावर अधिक बोलताना ते म्हणाले, “या निर्णयामुळे कांदा उत्पादकांचे फार मोठे नुकसान होणार आहे. गरीब शेतकऱ्यांचे हे उत्पादन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सांगत असतात, शेतकरी जे पिकवतात त्याचा दुप्पट मोबदला त्यांना मिळाला पाहिजे. त्यांचा फायदा झाला पाहिजे. जेव्हा कांद्याचा भाव एकदम खाली घसरतो. कांदा रस्त्यावर फेकून दिला जातो. तेव्हा सरकार शेतकऱ्यांना पैसे भरून देते का?”, असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.

भाव खाली उतरल्यावर शेतकऱ्याला पैसे द्या. पण तसे सरकार करणार नाही. मात्र भाव वाढले की, ताबडतोब त्यावर निर्यातबंदी आणणार. अचानक निर्यातबंदी केल्याने परदेशातील व्यापारावर परिणाम होतो. अनेक वस्तूंचे भाव वाढतात त्यावर सरकार निर्यातबंदीचा निर्णय घेत नाही. केवळ शेतकऱ्याचा काही माल असेल विशेषतः कांदा, त्याचाच वांदा करायला केंद्र सरकारमधील लोक तयार असतात. त्यामुळे साहजिकच लोकांचा उद्रेक होणार, लोक रस्त्यावर येणार,असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. दरम्यान, निर्यातबंदीच्या या निर्णयाबाबत फेरविचार करू, अशी हमी केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिली आहे.

Previous articleसोनू महाजन हल्ला प्रकरणी भाजप खासदाराची होणार चौकशी
Next articleमंत्री उदय सामंत यांना ‘अभाविपची’ धमकी