सोनू महाजन हल्ला प्रकरणी भाजप खासदाराची होणार चौकशी

मुंबई नगरी टीम

नागपूर : माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी भाजपने शिवसेनेवर टीका करत त्यांना घेणाऱ्याच्या प्रयत्न केला. मात्र महाविकास आघाडी सरकारनेच आता भाजपच्या अडचणीत वाढ केली आहे. चार वर्षांपूर्वी भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी माजी सैनिकाला मारहाण केली होती. या प्रकरणी आता उन्मेष पाटील यांची चौकशी होणार असून तसे आदेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.

२०१६ साली भाजपचे तेव्हाचे आमदार आणि सध्याचे खासदार उन्मेष पाटील व इतरांनी माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर हल्ला केला होता. तेव्हाच्या भाजप सरकराने महाजन यांना न्याय दिला नाही. यासंदर्भात मला मिळालेल्या अनेक निवेदनांनुसार पोलिसांना उन्मेष पाटील यांची या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत”, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली. “२०१६ साली हा गुन्हा घडला होता.पण तेव्हा भाजपचे सरकार असल्याने पाटील यांच्यावर एफआयआर दाखल झाला नाही. त्यानंतर २०१९ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. परंतु पुढे कोणतीही कायदेशीर कारवाई उन्मेश पाटील यांच्यावर झाली नाही”, असे अनिल देशमुख म्हणाले.

माजी सैनिक सोनू महाजन यांच्या पत्नी मनीषा महाजन यांनी या प्रकरणाची फेरचौकशी करण्यात यावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.२०१६ मध्ये केवळ राजकीय दबावापोटी कारवाईपासून दूर राहिलेल्या भाजपच्या नेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे. या निवेदनाची दखल घेऊन गृहमंत्री देशमुख यांनी चार वर्षांपूर्वी माजी सैनिकाला मारहाण करणा-या उन्मेष पाटील त्यांच्या साथीदाराविरोधातील केस पुन्हा उघड करण्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह व्यंगचित्र फॉरवर्ड केल्याच्या कारणास्तव माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण करण्यात आली होती. शिवसेनेच्या सहा कार्यकत्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप आहे. या आरोपींना तात्काळ जामीन मिळाल्याने भाजपने आंदोलन पुकारत ठाकरे सरकारवर टीका केली होती. पंरतु यासोबतच ठाकरे सरकारने तत्कालीन भाजप सरकारचा जुना लेखाजोखा काढत खासदार उन्मेष पाटील यांनी माजी सैनिकाला मारहाण केल्याचे प्रकरण पुन्हा पुढे आणले आहे.

Previous articleम्हाडाकडून लवकरच मुंबई आणि ठाणेकरांना मोठं गिफ्ट, जितेंद्र आव्हाडांची महत्त्वाची घोषणा
Next articleकांद्याचा वांदा करायला केंद्र सरकार कायम तयार :  छगन भुजबळांची टीका