मुंबई नगरी टीम
नवी दिल्ली : डबघाईला आलेल्या देशाच्या आर्थिक स्थितीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज संसदेत केंद्र सरकारवर निशाणा साधला. देशाची आर्थिक घडी बिघडलेली असताना केंद्र सरकारकडून सहा सरकारी कंपन्या बंद करण्याचा विचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे.
याविषयी अधिक बोलताना संजय राऊत म्हणाले “देशाची आर्थिक स्थिती खूप गंभीर आहे.अशा स्थितीत देशाचा जीडीपी घसरला आहे. तर आपली आरबीआय देखील कंगाल झाली आहे. अशावेळी सरकारने एअर इंडिया,रेल्वे,एलआयसी व आणखी बरेच काही बाजारात विक्रिसाठी आणले आहे. बाजारात खूप मोठा सेल लागला आहे. आता या सेलमध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट देखील आणले आहे”, अशी टीका त्यांनी केली आहे.तसेच सरकार जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट खासगी कंपनीकडे देण्याचा विचार करत आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे जगातील सर्वात मोठे बंदर आहे. त्यामधून भारत सरकारला ३० टक्क्याहून अधिक जास्त नफा मिळतो. अशा महत्वपूर्ण बंदराला खासगी कंपनीच्या हातात देणे हे देशाच्या राष्ट्रीय संपत्तीचे खूप मोठे नुकसान आहे, असेही राऊत म्हणाले.
दरम्यान, संजय राऊत यांनी यावेळी कोरोनाच्या विषयावर देखील संसदेत भाष्य केले. देशात दिवसागणिक मोठी रुग्णसंख्या वाढत आहे. यावर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी संसदेत निवेदन दिले. यावर बोलताना संजय राऊत यांनी हा राजकीय लढा नसून लोकांचा जीव वाचवण्याची लढाई असल्याची टीका सरकारवर केली आहे. तर, महाराष्ट्रात अनेक रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. धारावीतील परिस्थिती नियंत्रणात असून मुंबई महापालिकेचे कौतूक जागतिक आरोग्य संघटनेने देखील केले असल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. काही सदस्यांनी महाराष्ट्र सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका केली होती. त्याला उत्तर म्हणून संजय राऊतांनी हे स्पष्टीकरण दिले.