पंतप्रधानांच्या वाढदिवशी ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ ट्रेडिंग ;सोशल मिडियावर मिम्सचा पाऊस

मुंबई नगरी टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७० वा वाढदिवस आहे.यानिमित्त पंतप्रधान मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एकीकडे मोदींचा वाढदिवस हा ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय भाजपने घेतला. तर दुसरीकडे विरोधकांनी मोदींचा वाढदिवस आणखी काही वेगळ्या कारणासाठी लक्षात राहावा यासाठी एक शक्कल लढवली आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करण्याचे आवाहन विरोधकांकडून करण्यात आले आहे. इतकेच काय तर हा हॅशटॅग देखील ट्विटरवर ट्रेंड करण्यात आला आहे. बुधवारी रात्री बारा वाजल्यानंतर अवघ्या काही तासांतच हा हॅशटॅग ट्रेंड झालेला पाहायला मिळाला.

#राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस, #NationalUnemplyomentDay हे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करण्यात आले आहेत. काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच या संदर्भातील ट्वीट केले होते. यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी  राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस हा हॅशटॅग ट्रेंड करण्याचे आवाहन केले होते. देशात बेरोजगारीची समस्या आधीच होती. त्यात कोरोनासारख्या महामारीने बेरोजगारीचे आणखी गंभीर चित्र दाखवले आहे. कोरोना काळात अनेकांच्या नोक-या केल्या त्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे सत्तेत आल्यावर मोदी सरकारने रोजगाराविषयी दिलेल्या आश्वासंनांची आठवण नेटक-यांनी यावेळी करून दिली आहे.

राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस हा हॅशटॅग वापरत नेटक-यांनी मोदी सरकारला प्रश्न विचारले आहेत. भाषण नको रोजगार द्या, तुम्ही आश्वासन दिलेले दोन कोटी रोजगार कुठे केले?, अशा अनेक मुद्दयांवरुन नेटक-यांनी मोदी सरकारला घेरले. तर काहींनी मीम्सच्या माध्यमातून बेरोजगारीचा प्रश्न अधोरेखित केला आहे. दरम्यान, भाजपकडून आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त ७० ठिकाणी ७० कार्यक्रम करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

Previous articleमोदींनी एअर इंडिया,रेल्वे,एलआयसीसह अजून बरंच काही बाजारात विक्रीला आणलयं  
Next articleमी केले तर राष्ट्रविरोधी मुख्यमंत्र्यांनी केले तर देशभक्ती का ?, जलील यांचा सवाल