मी केले तर राष्ट्रविरोधी मुख्यमंत्र्यांनी केले तर देशभक्ती का ?, जलील यांचा सवाल

मुंबई नगरी टीम

औरंगाबाद : मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या कार्यक्रमाला अनुपस्थिती आणि उपस्थितीच्या मुद्द्यावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. इम्तियाज जलील यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाला अनेकदा दांडी मारल्याने शिवसेनेने त्यांच्यावर टीका केली होती. मात्र यंदा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देखील अनुपस्थित होते. पंरतु त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली होती.यावरूनच इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

इम्तियाज जलील यांनी ट्वीट करत ही टीका केली आहे. “मराठवाडा मुक्ती संग्राम कार्यक्रमास माझी अनुपस्थिती म्हणजे राष्ट्रविरोधी आणि शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची अनुपस्थिती म्हणजे देशभक्ती का? आता निष्ठेचे प्रमाणपत्र देणारे आणि मीडिया गप्प का आहे?”, असा प्रश्न जलील यांनी केला आहे. तर मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम कार्यक्रमास येण्यास स्पष्ट नकार दिला. मराठवाड्याबद्दल माझ्या सचोटी आणि निष्ठेवर प्रश्न विचारणारे मुख्यमंत्र्यांना का विचारत नाही, यालाच मी दुहेरी मापदंड म्हणतो, अशी टीकाही जलील यांनी केली आहे.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमाला इम्तियाज जलील अनेकदा दांडी मारताना दिसले आहेत. यावरून शिवसेनेने जलील यांच्यावर टीका केली होती. जलील यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे वावडे आहे आणि ते स्वतःला निजामाचे वारसदार समजतात, अशी टीका करण्यात आली होती. तर यावेळी मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती लावल्याने इम्तियाज जलील यांनी संधी साधत शिवसेनेवर टीका केली आहे.

Previous articleपंतप्रधानांच्या वाढदिवशी ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ ट्रेडिंग ;सोशल मिडियावर मिम्सचा पाऊस
Next articleविरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांसह २५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल