मुंबई नगरी टीम
मुंबई : मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची गरज नाही.त्याऐवजी बौद्धिक विचार केंद्र निर्माण व्हावे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.प्रस्तावित स्मारकाबाबत आपला आधीपासूनच आक्षेप असून बाबासाहेबांच्या विचारांना साजेसे असे स्मारक बांधावे,असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रस्तावित स्मारकाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, पुतळा बांधण्याऐवजी तो पैसा कोरोनासाठी वापरा.पुतळ्याची अजिबात गरज नाही,असे ते म्हणाले. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदू मिलची जागा इंटरनॅशल स्कुल ऑफ स्टडीजसाठी दिली होती. अटल बिहारी वाजपेयी यांची इंदू मिल संदर्भात जी चिट्ठी आहे त्याचे अध्ययन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करावे, अशी माझी विनंती आहे. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांना इंदू मिलच्या जागेवर नेमके काय अपेक्षित होते. हे मुख्यमंत्र्यांनी पाहावे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर देखील टीका केली.उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ऐकू नये. अटल बिहारी वाजपेयींची जी चिट्ठी आहे त्याला अनुसरून निर्णय घ्यावा, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. दरम्यान, इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा पायाभरणी कार्यक्रम आज होणार होता. मात्र कार्यक्रमाला दिलेल्या आमंत्रणावरून राजकीय वर्तुळात मानापमान नाट्य सुरू झालेले पाहायला मिळाले. त्यामुळे आजचा हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. प्रकाश आंबेडकर यानांही या कार्यक्रमाचे आमंत्रण मिळाले नव्हते. या पार्श्वभूमीवर त्यांनी मुलाखत देताना इंदू मिलच्या जागी पुतळा उभारण्यास आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे.