अण्णाभाऊ साठे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय दर्जाचे स्मारके उभारणार

अण्णाभाऊ साठे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय दर्जाचे स्मारके उभारणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुंबईतील चिराग नगर-घाटकोपर येथे अण्णाभाऊ साठे यांचे वास्तव्य असणारे घर व बीआयटी चाळ-परळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असणाऱ्या घराच्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागामार्फत राष्ट्रीय दर्जाची स्मारके उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

वांद्रे पूर्व येथील महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) गृहनिर्माण भवन या मुख्यालयात आज आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी म्हाडामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती  आव्हाड यांनी घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना आव्हाड यांनी ही माहिती दिली.या दोन्ही स्मारकांसंदर्भात लवकरच पुढील कार्यवाहीला प्रारंभ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अण्णाभाऊ साठे यांचे वास्तव्य असणाऱ्या घराच्या ठिकाणी सद्यस्थितीत राहत असलेल्या रहिवाशांचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असणाऱ्या घराच्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांचे पुनर्वसन मुंबईत प्रकल्पग्रस्त म्हणून शासनातर्फे इतरत्र करण्यात येणार आहे. या दोन्ही स्मारकांना पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात येणार आहे असे आव्हाड यांनी सांगितले.

मुंबईमध्ये म्हाडाच्या मोठ्या भूभागावर जुन्या वसाहती आहेत. या वसाहतींच्या पुनर्विकासातून मोठ्या प्रमाणात गृह साठा उपलब्ध होणार आहे. या जुन्या वसाहतींच्या पुनर्विकासासाठी थेट परदेशी गुंतवणूक आणण्यासंदर्भात शासनातर्फे प्रयत्न करण्यात येणार आहे, असेही आव्हाड यांनी सांगितले. मध्यमवर्गीय मराठी माणसाचे घर घेण्याचे स्वप्नपूर्ती करणारी म्हणून म्हाडा या संस्थेकडे मोठ्या आशेने लोक पाहतात. म्हाडाच्या माध्यमातून गृहनिर्मितीच्या प्रक्रियेला वेग देण्याचा प्रयत्न करणार असून परवडणाऱ्या दरातील अधिकाधिक सदनिका उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस असल्याचे मंत्री आव्हाड यांनी सांगितले. ४५ दिवसांच्या आत फायलीचा निपटारा म्हाडामध्ये केला जात असून ही कौतुकास्पद बाब असल्याचे आव्हाड म्हणाले.

Previous articleआदित्य ठाकरेंच्या “नाईटलाईफ”संकल्पनेला भाजपचा विरोध
Next articleराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्या इंदू मिलच्या जागेची पाहणी करणार