मुख्यमंत्री घरात आणि मंत्रालयीन कर्मचारी मृत्यूच्या दारात : प्रवीण दरेकरांची टीका

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्याचे प्रशासकीय मुख्यालय असणाऱ्या मंत्रालयात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होताना दिसत आहे. मंत्रालयातील कर्मचारी,अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत असून अनेकांचा जीव देखील गेला आहे. यावरूनच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्री घरात आणि कर्मचारी मृत्यूच्या दारात, अशी टीका दरेकरांनी केली आहे. तसेच मंत्रालयीन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची हमी मुख्यमंत्र्यांना द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

मुख्यमंत्री घरात आणि मंत्रालयीन कर्मचारी मृत्यूच्या दारात,हे काही बरोबर नाही.मंत्रालयीन कर्मचारी, अधिकारी यांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहे.आजही कमर्चारी उपाययोजनांची, सुरक्षेची मागणी सरकारकडे करत आहेत. आज मंत्रालयीन कारभार ज्यांच्या जीवावर चालतो तेच सुरक्षित नसतील तर, ते आपल्यासाठी शोभा देणारे नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची हमी द्यावी, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

कोरोनाकाळात मुख्यमंत्री हे घरातूनच काम पाहत आहेत.व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका घेत आहेत. यावरून विरोधक वारंवार मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत आहेत.त्यात मंत्रालयातील कर्मचारी अधिकाऱ्यांना होणारी कोरोनाची लागण पाहता,सरकारने त्यांना सुरक्षेची हमी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, राजपत्रित अधिकारी महासंघाने केलेल्या दाव्यानुसार गेल्या साडे पाच महिन्यात तब्बल पंधरा मंत्रालयीन कर्मचारी, अधिकारी कोरोनामुळे दगावले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Previous articleनरेंद्र मोदींच्या काळात लोकशाही रसातळाला गेली : बाळासाहेब थोरातांची टीका
Next articleखुशखबर : ऑनलाईन पध्दतीने ३ हजार ४०१ पदांसाठी भरती सुरु ; येथे नोंदणी करा