खोके सरकारचे लक्ष उद्योग, कृषी क्षेत्रावर नाही; आदित्य ठाकरेंची सरकारवर सडकून टीका

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुंबई महानगरपालिकेच्या कामांवरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली.मुंबई महानगरपालिकेत सध्या तीन गोष्टी सुरू आहेत;त्या म्हणजे टेंडर,बदल्या आणि टाइमपास.याशिवाय आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या रस्त्यांच्या डागडुजीवरून देखील टीकास्त्र डागलं.मुंबईतील खड्डेमय रस्ते एका रात्रीत चकाचक करू आणि त्यासाठी ५ हजार कोटी रुपये दिले जातील अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती; या घोषणेचं काय झालं, असा सवाल त्यांनी केला.तसंच राज्यातील खोके सरकारचं लक्ष उद्योग आणि कृषी क्षेत्रावर नसून ते केवळ राजकारणवर आहे, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला.

आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेतील कामावर बोलताना म्हणाले की, घटनाबाह्य पद्धतीने सत्तेवर आणल्यानंतर घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.यात मुंबईतील रस्ते एका रात्रीत चकाचक करण्यासाठी ५ हजार कोटी रुपये देणार या बरोबरच, दहीहंडीला खेळाचा दर्जा, राज्यात फॉक्सकॉनपेक्षाही मोठा प्रकल्प आणणार या घोषणांचा पाऊस पडला. या सर्व घोषणांचं काय झालं ?, असा सवाल ठाकरे यांनी केला.मुंबईतील खड्डेमय रस्ते चकाचक करण्यासाठी ५ हजार कोटींचे टेंडर काढण्यात आलं, मात्र ते रद्दही करण्यात आले. मग आता रस्त्यांचे काय होणार हे कोणालाच माहीत नाही. दरवर्षी दोन ते अडीच हजारांचे टेंडर निघत होते परंतु आता ते निघत नाही आहेत. टेंडर रद्द झाल्यानंतर हे ५ हजार कोटींचे रस्ते बनवणार कधी ? एका रात्रीत चकाचक रस्स्ते कधी करणार? एखादा रस्ता बवण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांवर काम करावं लागतं. एका रात्रीत कसं काय रस्ते चकाचक करणार, असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले.

Previous article४ महिन्यात ११३० शेतकऱ्यांच्या आत्महत्या,सरकारकडून केवळ घोषणाबाजी
Next articleतर येणा-या पिढ्या विचारत राहतील, अरे भाई कहना क्या चाहते हो…? फडणवीसांचे राहुल गांधींना सडेतोड सवाल