कर्मचा-यांनी आकाशातून उडत कामावर जायचे काय ? मनसेचा खोचक सवाल

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील उपहारगृहे पुढील महिन्यापासून सुरू करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. यावरून आता मनसेने प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्र्याना टोला लगावला आहे. शिथिलीकरणाच्या पाचव्या टप्प्यात उपहारगृहे सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी सरकारने काही मार्गदर्शक त्तत्वे तयार केली आहेत. त्यावर अंतिम निर्णय झाल्यास पुढील आठवड्यापासून उपहारगृहे सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मकता दाखवली आहे.

परंतु राज्यातील उपहारगृहे सुरू करायची असल्यास तिथल्या कर्मचा-यांच्या वाहतूक व्यवस्थेचे काय असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. “अनलॉक पाच सूरू होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले की, उपहारगृह सुरू करणार आहेत. तिथे काम करणा-या कर्मचा-यांची वाहतूक व्यवस्था काय? की त्यांनी आकाशात उडत कामावर यायचे?”,असा प्रश्न विचारत संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. या संदर्भातील ट्वीट त्यांनी केले आहे.

नागरिकांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा द्या,अशी मागणी मनसेकडून उचलून धरण्यात आली आहे. त्यासाठी मनसेने आंदोलन देखील केले, मात्र सरकारने लोकल प्रवासाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. शिथिलीकरणाचा पाचवा टप्पा १ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे या पाचव्या टप्प्यात आणखी काही निर्बंध शिथिल करण्याचे सुतोवाचक मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्यानुसार राज्यातील उपहारगृहे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी राज्यातील उपहारगृह व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली असता उपहारगृहे सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

Previous articleअनुसूचित जमाती व वननिवासी कुटुंबांसाठी राज्यपालांनी घेतला मोठा निर्णय
Next articleऊसतोड कामगारांची नोंदणी व महामंडळाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार