विनायक मेटेंना झटका; विचार मंथन बैठकीला सातारच्या दोन राजांची दांडी

मुंबई नगरी टीम

पुणे : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा विचार मंथन बैठक पार पडली.यावेळी विशेष निमंत्रण असणाऱ्या भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे दिसले.उदयनराजे या बैठकीला येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.मात्र आले नाहीत, अशी खंत यावेळी विनायक मेटे यांनी व्यक्त केली.

मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरत असताना अनेक ठिकाणी मराठा क्रांती समन्वयक पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत आहेत. त्यानुसार मराठा विचार मंथन बैठक देखील आयोजित करण्यात आली होती. त्याचे निमंत्रण राज्यातील अनेक नेत्यांना देण्यात आले होते. त्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना विनायक मेटे यांनी स्वतः भेटून बैठकीचे निमंत्रण दिले होते. तर उदयनराजे यांनी बैठकीला उपस्थित राहणार असे आश्वासनही दिले होते. परंतु आज काही ते बैठकीला उपस्थित राहिले नाही.

उदयनराजे भोसले मला येतो म्हणाले होते. पण ते का आले नाहीत माहित नाहीत, अशी खंत यावेळी विनायक मेटे यांनी व्यक्त केली. आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सुसूत्रता यावी यासाठी सर्वांना बोलवले होते. तसेच ठोक मोर्चाच्या प्रमुख प्रतिनिधींना बोलावले होते. आपल्यातील जे मतभेत आहेत त्यावर चर्चा करू सांगितले. पंरतु प्रमुख नेत्यांनी अनुपस्थिती लावल्याने विनायक मेटेंनी नाराजी व्यक्त केली. तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वांनी एका दिशेने राहण्याची मागणी विनायक मेटे यांनी केली आहे. यासह मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोवर एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती यावेळी विनायक मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केली आहे.

Previous articleबिहार निवडणुकीसाठी सुशांतच्या मृत्यूचं भांडवल करू पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर पाणी
Next articleशेतकऱ्यांच्या परिस्थितीस ठाकरे सरकार जबाबदार : प्रवीण दरेकर