आता संभाजी भिडे सातारा,सांगली आणि कोल्हापूर बंद करणार का ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : मराठा आरक्षण लढ्याच्या नेतृत्त्वाविषयी भूमिका मांडताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खासदार संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांच्यासंदर्भात केलेल्या विधानानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत नाराजी व्यक्त केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती घराण्याच्या वंशजांसंदर्भात केलेले वक्तव्य हे त्यांच्या समर्थकांना आणि महाराष्ट्राला पटणारे नाही. माझ्याकडून अशा प्रकारचे विधान झाले होते तेव्हा संभाजी भिडे यांनी आंदोलन पुकारले होते. तर आता प्रकाश आंबेडकरांविरोधात ते आंदोलन करणार का?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊत यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबत भाष्य केले. प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही राजेंसंदर्भात केलेल्या विधानावर प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणले,यापूर्वी मी छत्रपती घराण्यासंदर्भात विधान केले होते तेव्हा संभाजी भिडे यांनी आंदोलन पुकारले होते. आता मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे.आताही ते सातारा,सांगली आणि कोल्हापूर बंद करणार का? हे मी त्यांना विचारेन. म्हणजे आम्हालाही भूमिका घेता येईल, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी संभाजी भिडेंना दिले आहे.

मराठा आरक्षणाच्या नेतृत्त्वाविषयी भूमिका मांडताना प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही राजेंवर निशाणा साधला होता. “दोन्ही राजेंचा आंदोलनाला पाठिंबा आहे, असे मला वाटत नाही. एक राजा तर बिनडोक असल्याचे मी म्हणेन, तर दुसरे संभाजी राजे यांनी आरक्षणाबद्दल घेतलेली भूमिका बरोबर आहे. पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर अधिक भर देत असल्याचे दिसत आहे. ज्या माणसाला राज्य घटना माहिती नाही. आम्हाला आरक्षण मिळाले नाही, तर सर्वांचे आरक्षण रद्द करा, असे ते म्हणतात. त्यावरून भाजपाने यांना राज्यसभेवर कसे पाठवले? हाच प्रश्न उपस्थित होतो”, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.

Previous articleकोरोनामुळे होणारा मृत्यूदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट
Next articleशिवसेनेच्या उत्तर भारतीय,दक्षिण भारतीय विंगचे पदाधिकारी मराठीत बोलतात का ?